अजय जयरामचीही आगेकूच

भारताच्या सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. घोटय़ावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या अव्वल मानांकित सायनाने थायलंडच्या चॅसीनी कोरेपॅपचा २१-९, २१-८ असा पराभव केला. २६ वर्षीय सायनाने गेल्या वर्षी दुखापत होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. मात्र, रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला अपयश आले. पुढील फेरीत तिच्यासमोर इंडोनेशियाच्या हॅना रामदीनीचे आव्हान आहे.

प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सहाव्या मानांकित जयरामने पहिल्या फेरीत मलेशियाच्या जून हाओ लीओंगचा २१-१०, १७-२१, २१-१४ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याने इंडोनेशियाच्या सापुत्रा विकी अ‍ॅनग्गावर २१-९, २१-१२ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या जयरामनला पुढील फेरीत चायनीस तैपेईच्या सेयुहू सुआन यीचा सामना करावा लागेल. हेमंत गोवडाला चायनीस तैपेईच्या चून-वेई चेनकडून ५-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीत मनू अत्री व ज्वाला गट्टा यांनी इंडोनेशियाच्या लुखी अ‍ॅप्री नुग्रोहो व रिरीन अमेलिया या जोडीवर २१-१९, २१-१८ असा, तर महिला दुहेरीत अपर्णा बालन व प्राजक्ता सावंत यांनी २१-१०, २१-११ अशा फरकाने इंडोनेशियाच्या अघीस्ना फथकुल लैली व अप्रिलसासी पुट्री लेजार्सर यांच्यावर विजय मिळवला. प्राजक्ताने मिश्र दुहेरीत मलेशियाच्या योगेंद्रन कृष्णनसह खेळताना हाँगकाँगच्या ही चून मॅक व येऊंग एनगा टींग जोडीचा २१-१४, २२-२० असा पराभव केला.

मिश्र दुहेरीत सहाव्या मानांकित टोंटोवी अहमद आणि ग्लोरीया इमान्युले विड्जाजा या इंडोनेशियाच्या जोडीने बी सुमिथ रेड्डी व अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले. महिला दुहेरीत के. पी. श्रुती आणि हरिथा मनाझीयील यांना पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या मेई कुआन चोव आणि व्हिव्हियन हू यांनी भारतीय जोडीवर २१-९, २१-१३ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत हाँगकाँगच्या टॅम चुन हेई आणि एनजी टीस्ज यांनी भारताच्या सत्विकसाईराज रांकीरेड्डी व मनीषा के. यांना २१-१०, २१-१४ पराभूत केले.