विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांनी अपेक्षेप्रमाणे इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र आनंद पवार, अजय जयराम, सायली गोखले, तन्वी लाड यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
ऑल इंग्लंड स्पर्धेत नुकतेच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सायनाने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या रिया मुखर्जी हिला २१-५, २१-१३ असे हरविले. ऑल इंग्लंड स्पर्धेतील विजेती कॅरोलिना मरीन (स्पेन) हिने भारताच्या नेहा पंडित हिचा २१-७, २१-८ असा दणदणीत पराभव केला.
पुरुषांमध्ये श्रीकांतने विजयी प्रारंभ करताना थायलंडच्या तानोंगसिक सेन्सोझोंत्सुक याला २१-१७, २१-१६ असे हरविले. आर.व्ही. गुरुसाईदत्त याने लीउ किउन याच्यावर २१-१४, १७-२१, २३-२१ असा रोमहर्षक विजय मिळविला. अजय जयराम याला हाँगकाँगच्या हुओ युआन याने १५-२१, २१-९, २१-१५ असे पराभूत केले. चीन तैपेईच्या लिन युहिसेक याने आनंद पवार याचा १५-२१, २१-१७, २१-१५ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. के.एस. प्रणोय याने आव्हान राखताना इस्रायलच्या लिसे झिल्वेरोज याचा २२-२०, २१-८ असा पराभव केला.
 भारताच्या रिया पिल्ले हिने आपलीच सहकारी एकता वालिया हिला २३-२१, २१-१५ असे हरवत दुसरी फेरी गाठली. जी. ऋत्विका शिवानी हिने ऋचा निकम हिचे आव्हान २१-७, २१-६ असे लिलया संपुष्टात आणले. चीन तैपेईच्या हिसु याचिंग हिने तन्वी लाड हिचा २१-९, २१-१८ असा पराभव केला.
राचनोक इन्तोतोन हिने सायली राणे हिच्यावर २१-९, २१-११ अशी मात केली.

महिला दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यांना चीनच्या ओऊ दोंगनी व झिआ ओहान यांनी २१-१०, २१-१८ असे नमविले. मिश्र दुहेरीत अक्षय देवलकर व प्रज्ञा गद्रे यांचे आव्हान संपुष्टात आले. दक्षिण कोरियाच्या हुक यंग किम व युओ हेईनोन यांनी त्यांना २१-१८, २१-१० असे हरविले.
समीर वर्माचा धक्कादायक निकाल
*पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारताच्या समीर वर्माने धक्कादायक निकालाची नोंद करत पाचव्या मानांकित डेन्मार्कच्या हान्स क्रिस्टियन विंट्टींघसचा पराभव केला़  वर्माने ही लढत ३३ मिनिटांच्या कालावधीत २१-१५, २१-१७ अशी सरळ सेटमध्ये जिंकून उपस्थितांची वाहवा मिळवली़
*माजी कनिष्ठ विजेता आणि आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या समीरने दमदार खेळ केला़  २०११मध्ये दुखापतीमुळे त्याला काही काळ खेळापासून दूर राहावे लागले होत़े  
*या विजयानंतर समीर म्हणाला, ‘‘सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केल्यामुळे मला गुणांची कमाई करता आली़  दुसऱ्याच सामन्यात मी चांगली कामगिरी केली़  अनुभवी प्रतिस्पर्धी खेळाडूनेही चांगला संघर्ष केला़  याच कामगिरीची पुनरावृत्ती पुढील सामन्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल़ ’’