उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात
जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सलग दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागल्यामुळे बीडब्ल्यूएफ जागतिक सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सायनाला इंडोनेशियाच्या रात्चानोक इन्टानोन हिच्याकडून १३-२१, १६-२१ असे पराभूत व्हावे लागले. त्याआधी सलामीच्या सामन्यात डेन्मार्कच्या टिने बाऊन हिने सायनावर १४-२१, २१-११, १९-२१ अशी मात केली होती.
चीन रिसोर्सेस शेनझेन बे स्पोर्ट्स सेंटरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सायनाला रात्चानोक हिचा कडवा प्रतिकार परतवून लावता आला नाही. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायनाने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या रात्चानोकसमोर गुडघे टेकले. चौथ्या मानांकित सायनाला आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे पहिल्या गेममध्ये ती ५-१४ अशी पिछाडीवर पडली होती. पण २२ वर्षीय सायनाने जोमाने पुनरागमन करत सलग सात गुण जिंकले आणि सामना १२-१४ अशा स्थितीत आणला. रात्चानोक हिने स्मॅशेसच्या फटक्यांचा सुरेख वापर करून सलग सहा गुण मिळवले आणि पहिला गेम खिशात टाकला.
पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने दुसऱ्या गेममध्ये कडवी लढत दिली. सामना १६-१६ अशा बरोबरीत असताना रात्चानोक हिने पाच गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. सायनाची पुढील लढत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन श्चेंक हिच्याशी होणार आहे. सायनाने श्चेंकविरुद्ध दहापैकी सात सामने जिंकले आहेत. पण उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राखण्यासाठी सायनाला श्चेंकविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
अव्वल स्थान पटकावणे
कठीण -सायना
अव्वल स्थानी झेप मारणे कठीण असून ते शिखर साध्य झाल्यावर एकटेपणाची भावना येईल, असे सायनाने सांगितले. ‘‘माझ्या पालकांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आहे. अनेक गोष्टींचा त्याग केल्यामुळेच मी इथवर मजल मारू शकले. पाटर्य़ा करायला मला आवडत नाहीत तर सिनेमे पाहणे, खरेदी करणे आणि टेनिसचे सामने पाहायला मला आवडते. विजयानंतर पुढची सकाळ झोपून काढणे, हाच माझ्यासाठी जल्लोषाचा क्षण असतो,’’ असेही सायना म्हणाली.