ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
सायनाला अजिंक्यपद टिकविण्यासाठी एक तास १९ मिनिटे झुंजावे लागले. क्षणाक्षणाला सामन्याचे पारडे हलत होते. त्यामुळे सामन्याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण होत गेली. सायनाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा व मानसिक तंदुरुस्तीचा फायदा झाला. सायनाने १६-१२ अशी आघाडी असतानाही खेळावर नियंत्रण गमावले. तिने हा गेम गमावला. मात्र दुसऱ्या गेममध्ये तिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवले. स्पॅनिश खेळाडू कॅरोलीनाने ही गेम घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र सायनाने अनेक मॅच पॉइन्ट्स वाचवले. तिने हा गेम घेत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. साहजिकच तिसऱ्या गेमबाबत उत्सुकता निर्माण झाली.
सायनाने ९-४ अशा आघाडीनंतर सातत्याने आघाडी टिकवत हा गेम मिळवीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
महिलांमध्ये सायना नेहवालने विजेतेपद कायम राखत विश्वविजेती खेळाडू कॅरोलीना मरीनला १९-२१, २५-२३, २१-१६ असे नमवले. पुरुषांमध्ये कश्यपने अग्रमानांकित खेळाडू कदम्बी श्रीकांतवर २३-२१, २३-२१ अशी मात केली.
स्पर्धेतील दोन्ही गटांच्या अंतिम लढतीत रोमहर्षक खेळ पाहायला मिळाला. कश्यपने ५१ मिनिटांत विजय मिळवताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग केला.
श्रीकांतनेही शेवटपर्यंत कश्यपला कडवी झुंज दिली. त्यामुळे हा सामना रंगतदार झाला. अखेर कश्यपने खेळावर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली. श्रीकांतने नुकत्याच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्या कामगिरीची पुनरावृत्ती तो येथे करील अशी अपेक्षा होती, मात्र संघर्षपूर्ण लढतीत त्याला पराभव पत्करावा लागला.