जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सलग पाच वर्षे उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करू न शकणाऱ्या सायनाने यंदा अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला. अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिन मारिनकडून पराभूत झाल्यामुळे सायनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र या रौप्यपदकासह सायनाने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने गुरुवारी क्रमवारी जाहीर केली. यानुसार ८२,७९२ गुणांसह ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवाल अव्वलस्थानी आहे.
२६ वर्षीय सायनाने यंदा मार्च महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले. क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. मात्र त्यानंतर दुखापती आणि कामगिरीत सातत्य न राखता आल्याने सायनाची दुसऱ्या आणि त्यानंतर थोडय़ाच दिवसांत तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र खांद्याच्या दुखापतीची तमा न बाळगता खेळणाऱ्या सायनाने जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक प्रदर्शनासह रौप्यपदकाची कमाई केली.
दरम्यान, क्रमवारीत पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने दोन स्थानांनी सुधारणा करत आठवे स्थान प्राप्त केले आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीने दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल दहांमध्ये स्थान पटकावले आहे. किदम्बी श्रीकांतची एका स्थानाने घसरण झाली असून तो चौथ्या स्थानी स्थिरावला आहे.
पी. व्ही. सिंधूची एका स्थानाने घसरण झाली असून ती १४व्या स्थानी आहे. मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीची पाच स्थानाने घसरण होऊन ते २२व्या स्थानी आहेत.

आयओएस कंपनीशी सायनाचा करार
बॅडमिंटन विश्वात नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सायना नेहवाल व्यावसायिक क्षेत्रातही दमदार वाटचाल करते आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकविजेत्या सायनाशी आयओएस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एण्टरटेनमेंट कंपनीने दोन वर्षांचा करार केला आहे. सायना संदर्भातील जाहिराती, कार्यक्रमातील सहभाग, ब्रॅण्डविषयक कार्यक्रम, स्वामित्व हक्क, डिजिटल हक्क, समाजमाध्यमांवरील खाती यांची जबाबदारी आयओएस कंपनीकडे असणार आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायनाकरता २५ कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्टष्ट आयओएसने आखले आहे.