चीनच्या वांग यिहानवर नमवत संस्मरणीय विजय

जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या सायना नेहवालने चीनच्या वांग यिहानला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. वांगविरुद्ध नऊवेळा पराभूत झालेल्या सायनाने या विजयासह कामगिरी सुधारली. सायनाने ही लढत २१-१३, २१-१८ अशी जिंकली. अंतिम लढतीत सायनासमोर ली झेरुईचे आव्हान आहे.
पहिल्या गेममध्ये वांगने ५-३ अशी आघाडी घेतली. यानंतर सायनाने सलग सहा गुणांची कमाई करत ९-५ आणि ११-७ अशी दमदार आघाडी घेतली. वांगने झुंजार खेळ करत ११-११ अशी बरोबरी केली. १४-१३ अशी स्थितीतून सलग सात गुण पटकावत सायनाने पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने ९-६ अशी मजबूत आघाडी घेतली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या वांगने झंझावाती खेळ करत १०-१० अशी बरोबरी केली. सायनाने टिच्चून खेळ करत १३-११ अशी निसटती आघाडी घेतली. यानंतर प्रत्येक गुणासाठी रंगलेल्या मुकाबल्यात सायनाने सर्वागीण वावरासह, भात्यातल्या प्रत्येक फटक्याचा प्रभावी उपयोग करत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्याने सायना नेहवाल एकमेव आशास्थान आहे.

अंतिम फेरीत वाटचाल करणे अद्भुत आहे. उपांत्य फेरीत वांग यिहानसारख्या बलाढय़ खेळाडूला नमवणे समाधानकारक आहे. मी सातत्याने चांगले खेळत आहे. प्रत्येक टप्प्यागणीक कामगिरीत सुधारणा होणे आनंददायी आहे. यिहानविरुद्ध मी सर्वाधिक वेळा पराभूत झाले आहे. मात्र आता मी सलग तीन सामन्यांत तिला नमवले आहे. नेटजवळून अफलातून खेळ करत यिहान आगेकूच करत असे. तिचे स्मॅशचे फटके परतावणे अवघड जात असे. मात्र आता तिच्या दमदार खेळाला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे.
सायना नेहवाल