जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलेली सायना नेहवाल विश्रांतीनंतर आशिया बॅडमिंटन स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सायनाने दिल्लीत झालेल्या भारतीय खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यानंतर मलेशियात झालेल्या स्पर्धेत तिला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. सातत्याने असलेल्या स्पर्धामधून विश्रांती घेण्याचा सायनाने निर्णय घेतला. यामुळे सिंगापूर सुपर सीरिज स्पर्धेत ती सहभागी झाली नव्हती. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन करण्यासाठी सायना तयार आहे. सायनाला थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला असून, जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध तिची सलामीची लढत होणार आहे. सायनाने दोन वेळा नोझोमीवर मात केली आहे. नंतरच्या फेरीत सायनापुढे ली झेरुई, यिहान वांग व सिझियान वांग यांचे आव्हान असणार आहे.
सईद मोदी चषक स्पर्धेत यंदा विजेतेपद मिळविणाऱ्या कश्यपला पहिल्या लढतीत सिंगापूरच्या जेई लियांग वांग याच्याशी खेळावे लागणार आहे. कश्यप याने आतापर्यंत चार वेळा त्याला हरविले आहे. भारताच्या किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. एकेरीतच पाच वेळा विश्वविजेतेपद व दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या लिन डॅन याच्या सहभागामुळे ही स्पर्धा रंगतदार होणार आहे. त्याच्याबरोबरच जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू चेन लाँग, टॉमी सुगिआतरे, तानोंगसाक सीमबोंगसुक, केन्तो मोमोता व शोई सासकी यांच्याकडूनही येथे अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताच्या पी. व्ही. सिंधू हिच्याकडूनही प्रभावी कामगिरीची आशा व्यक्त केली जात आहे. अलीकडेच दुखापतीमधून ती तंदुरुस्त झाली आहे. गतवर्षी याच स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. तिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून दुसऱ्या फेरीत तिची अनैत खुर्शुबदीयान हिच्याशी लढत होईल. गतवर्षी या स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांची पहिल्या फेरीत याचिंग हुसो व युपो पेई यांच्याशी गाठ पडणार आहे. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर व प्रणव चोप्रा यांच्यापुढे हिरोयुकी एन्दो व केनिची हायाकावा यांच्याशी लढत होईल.