जपानविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी भारतीय महिला संघाने उबेर चषक बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. ‘ड’ गटातील अखेरच्या सामन्यात जपानने ३-२ अशा फरकाने भारतावर विजय मिळवला, परंतु गटात दुसरे स्थान निश्चित करून भारताने आगेकूच कायम राखली.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पध्रेत पुरुष संघाने निराशाजनक कामगिरीची पुनरावृत्ती केली. ‘ब’ गटातील अखेरच्या लढतीत इंडोनेशियाने ५-० असा दणदणीत विजय मिळवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पध्रेत भारतीय पुरुष संघाची पाटी कोरीच राहिली.
उबेर चषक स्पध्रेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला एकेरीत भारताला विजय मिळवून दिले, परंतु दोन दुहेरी लढतीत आणि तिसऱ्या एकेरीत भारताच्या वाटय़ाला पराभव आला आणि २०१४च्या उपविजेत्या जपानने बाजी मारली. ऑलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या जपानच्या नोझोमी ओकुहारावर २१-१८, २१-६ असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या निकालाबरोबर सायनाने गतवर्षी दुबई जागतिक सुपरसीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोन कांस्यपदके नावावर असलेल्या सिंधूने २१-११, २१-१८ अशा फरकाने अकेन यामागुचीचा ३६ मिनिटांत पराभव केला.
दुहेरीत ज्वाला गट्टा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला मिसाकी मॅत्सुटोमो आणि अयाका ताकाहाशीकडून ११-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला. जपानने या विजयाबरोबर सामन्यात १-२ असे पुनरागमन केले. तिसऱ्या एकेरीत जपानच्या सायाका सातोने २९ मिनिटांत रुत्विका शिवानी गद्देचा २१-७, २१-१४ असा पराभव करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. निर्णायक लढतीत अश्विनी पोनप्पा आणि सिंधू या जोडीने निराश केले. शिझुका मत्सुओ आणि मामी नैटो या जोडीने १५-२१, २१-१९, २१-१६ असा विजय मिळवून जपानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

भारतीय महिला रिले संघाचा राष्ट्रीय विक्रम
पीटीआय, बीजिंग
भारताच्या ४ बाय १०० मीटर महिला रिले संघाने आयएएएफ जागतिक चॅलेंज अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत ४४.०३ सेकंदाची वेळ नोंदवून चौथ्या स्थानासह १८ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. द्युती चंद, सराबनी नंदा, एचएम ज्योती आणि मेर्लिन जोसेफ यांचा समावेश असलेल्या संघाने १९९८ मध्ये सरस्वती डे, रचिता मिस्त्री, इबी श्याला आणि पी.टी. उषा यांनी नोंदवलेला ४४.४३ सेकंदाचा विक्रम मोडला.
मेर्लिनने स्पध्रेची सुरुवात केली. त्यापाठोपाठ ज्योती, सराबनी आणि द्युतीने धाव घेतली. यजमान चीन ‘अ’ आणि ‘ब’ संघाने अनुक्रमे पहिले व तिसरे, तर जपानने दुसरे स्थान पटकावले. चीन ‘अ’ संघाने ४२.६५ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले, जपानने ४३.८१ सेकंदासह रौप्य, तर चीन ‘ब’ ने ४३.८९ सेकंदासह कांस्यपदक पटकावले. भारतीय संघ पुढील आव्हानासाठी तैवानला रवाना होणार आहे.
दरम्यान, द्युतीला वैयक्तिक १०० मीटर स्पर्धेत सहभागी होता आले नाही. आयोजकांनी तिचे नाव राखीव धावपटूंमध्ये नोंदवले होते. मुख्य शर्यतीतील खेळाडूने माघार घेतली असती तर तिला संधी मिळाली असती.