भारताची ‘फुलराणी’ आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालची आशियाई बॅडमिंटन स्पध्रेतील विजयी घोडदौड उपांत्य फेरीत थांबली. चीनच्या यिहान वांगने २६ वर्षीय सायनावर अवघ्या ४१ मिनिटांत २१-१६, २१-१४ असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सायनाच्या पराभवासह भारताचे या स्पध्रेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. अंतिम फेरीत यिहानसमोर ऑलिम्पिक विजेत्या ली झेरुईचे आव्हान आहे.
विश्व अजिंक्यपद स्पध्रेतील (२०१५) उपविजेत्या सायनाचा यिहानविरुद्ध झालेल्या १५ लढतींमधील हा अकरावा पराभव आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने तुल्यबळ खेळ करत पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ९-६ अशी आघाडी घेतली होती, परंतु यिहानने हा गेम १०-१० असा बरोबरीत आणला. त्यानंतर यिहानने कामगिरीचा आलेख चढा ठेवत १४-१० आणि १६-११ अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर यिहानने २०१२च्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनावर दडपण निर्माण करत हा गेम २१-१६ असा जिंकला.
आक्रमकता, अचूकता आणि जलद पदलालित्य यांच्यात सातत्य राखत दुसऱ्या गेममध्येही यिहानने १३-४ अशी मजबूत आघाडी घेतली. सायानाने सलग तीन गुणांची कमाई करून हे अंतर ७-१३ असे कमी केले, परंतु यिहानने खेळात अधिक घोटीव सातत्य आणताना सायनावर निर्माण केलेले दडपण अधिक वाढवले. यिहानने सलग सहा गुणांची कमाई केली, त्याउलट सायनाला केवळ दोन गुण कमावता आले आणि गेम १९-९ असा पूर्णपणे यिहानच्या बाजूने झुकला. तरीही सायनाने अखेपर्यंत चिकाटीने खेळ करून पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तिला अपयश आले. यिहानने हा गेम २१-१४ असा जिंकला.