जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सायना नेहवालसह किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांनी इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूला मात्र सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.
द्वितीय मानांकित सायनाने थायलंडच्या निचॉन जिंदापॉनवर २१-१६, २१-१८ असा विजय मिळवला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सायनाने वैविध्यपूर्ण फटके आणि सर्वागीण वावरासह विजय साकारला.
तैपेईच्या ह्स्यू या चिंगने सिंधूवर १६-२१, २१-१५, २१-१४ अशी मात केली. पहिला गेम जिंकत सिंधूने आश्वासक सुरुवात केली. मात्र पुढच्या दोन्ही गेम्समध्ये चिंगने झंझावाती खेळासह सिंधूला निष्प्रभ केले.
पुरुषांमध्ये, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपने थायलंडच्या ताओंगन्सक सेइनबूनसुकला २१-१७, २१-७ असे नमवले.  किदम्बी श्रीकांतने डेन्मार्कच्या हान्स क्रिस्तिअन विथुनघुसचा ११-२१, २१-१४, २४-२२ असा पराभव केला. झुंजार लढतीत हान्सने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दिमाखदार खेळासह बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्रीकांतने विजय मिळवला.
पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने कॅनडाच्या अ‍ॅड्रियन लियू आणि डेरिक एन. जी जोडीवर २१-१७, २२-२० असा विजय मिळवला. तैपेईच्या ली शेंग म्यू आणि साइ चिआ ह्सिन जोडीने मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीवर २१-१३, २१-११ अशी मात केली.  महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने तैपेईच्या ह्स्यू या चिंग आणि पाइ यु पो जोडीवर २१-१७, १९-२१, २१-११ अशी मात करत दुसरी फेरी गाठली.