ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. सायना भारताचे एकमेव आशास्थान आहे.
सायनाने थायलंडच्या निचाओन जिंदापॉलवर सरळ गेममध्ये २१-१४, २१-१८ असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित सायनाने थायलंडच्या खेळाडूविरुद्ध खेळलेले सातही सामने जिंकले आहेत. पुढील फेरीत तिच्यासमोर तिसऱ्या मानांकित चीनच्या सिझियान वाँगचे आव्हान आहे. सायनाची सिझियानविरुद्ध जय-पराजयाची आकडेवारी ६-७ अशी आहे आणि गेल्या दोन्ही लढतीत सिझियानने वर्चस्व गाजवले आहे.
दुसरीकडे सिंधूला संघर्षपूर्ण लढतीत चायनीस तैपेईच्या ताई त्झु यिंगने २१-१३, २०-२२, ८-२१ असे नमवले. पहिला गेम सहज जिंकणाऱ्या सिंधूने दुसऱ्या गेममध्ये १२-६ अशी आघाडी घेतली होती, परंतु यिंगने दमदार पुनरागमन करून १५-१५ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर सामना २०-१९ असा सिंधूच्या पक्षात होता. मात्र, तिला यावेळी बाजी मारता आली नाही आणि सामना निर्णायक गेममध्ये गेला. पराभवासह सिंधूचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.