दुखापती आणि खराब फॉर्मशी झगडत यंदाच्या वर्षांत विजयपथावर परतणाऱ्या सायना नेहवालने नव्या वर्षांत आणखी जेतेपदांसह युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा संकल्प केला आहे. दिल्लीतील ग्रेटर नॉइडा परिसरात पहिल्यावहिल्या अकादमीच्या घोषणेच्या निमित्ताने सायना बोलत होती. नव्या वर्षांत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तिची तयारी सुरू होणार आहे.
युवा खेळाडूंना मार्गदर्शनाविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘‘दक्षिण भारतात बहुतांशी अकादमी आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातच अकादमीची स्थापना करायची होती. गौर सिटी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन अकादमीत मी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. अकादमीतील विद्यार्थ्यांना मी खेळ सुधारण्याच्या दृष्टीने काही गोष्टी सांगेन. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. उपक्रम यशस्वी झाल्यास विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करता येईल. स्पर्धात्मक स्तरावर खेळू
शकतील असे खेळाडू या अकादमीतून निर्माण व्हावेत अशी इच्छा आहे.’’
भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत, मात्र प्रशिक्षकांच्या बाबतीत आपण पिछाडीवर आहोत. प्रशिक्षक घडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याची खंत सायनाने व्यक्त केली.
‘‘इंडिया खुली स्पर्धा, ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धा आणि चीन सुपर सीरिज स्पर्धाच्या जेतेपदासह मी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. वर्षांची सुरुवात मी क्रमवारीत नवव्या स्थानासह केली आणि वर्षअखेर मी क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे,’’ असे सायनाने सांगितले.
खेळात नेमके कोणते बदल केले याविषयी सायना म्हणाली की, ‘‘तंदुरुस्त होण्यावर मी भर दिला. खेळ सर्वागीण होण्याकडेही मी लक्ष दिले. नवीन वर्षांत खेळात आणखी वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असेल. आणखी जेतेपद पटकावण्यासाठी माझा कसून सराव सुरू आहे. २०१६ ऑलिम्पिक वर्ष असल्याने या स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहणे हे माझे उद्दिष्ट आहे.’’