सायनाला यंदाच्या वर्षांतील पहिलेच विजेतेपद

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची आशा असणाऱ्या ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. यंदाच्या वर्षांतले सायनाचे हे पहिलेच जेतेपद आहे.

सातत्याचा अभाव आणि दुखापती यामुळे सायनाला यंदाच्या वर्षांत आतापर्यंत जेतेपदांनी हुलकावणी दिली होती. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत प्रत्येक फेरीगणिक खेळ सुधारत सायनाने बाजी मारली. या स्पर्धेचे सायनाचे हे दुसरे जेतेपद आहे. २०१४मध्ये सायना या स्पर्धेत विजेती ठरली होती.

अंतिम लढतीत सायनाने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या सन यू हिच्यावर ११-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवत जेतेपद जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने रत्नाचोक इन्टॅनॉन व उपांत्य फेरीत वांग यिहानसारख्या तुल्यबळ खेळाडूंना सायनाने नमवले होते.

सनविरुद्धच्या याआधी झालेल्या पाचही लढतींमध्ये सायनाने निर्भेळ यश मिळवले होते. मात्र अंतिम लढतीत सनच्या आक्रमक खेळासमोर सायना पहिल्या गेममध्ये निष्प्रभ ठरली. सुरुवातीला ४-४ अशी बरोबरी होती. सायनाच्या नेटजवळील चुकांमुळे सनने ७-४ अशी आगेकूच केली. ही आघाडी तिने ११-६ अशी वाढवली. शटल कोर्टबाहेर पडेल हा सायनाचा अंदाज तीन वेळा चुकल्याने सनने १७-१० अशी स्थिती गाठली. पुढचे चार गुण झटपट मिळवत सनने अवघ्या १८ मिनिटांत पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही ४-४ अशी बरोबरी होती. प्रतिस्पध्र्याना चकवणाऱ्या फटक्यांसह सनने ६-४ अशी सरशी साधली. मात्र सायनाने चांगल्या खेळासह प्रत्युत्तर देत ११-८ अशी आगेकूच केली. स्मॅशच्या फटक्याचा खुबीने वापर करत सायनाने सातत्याने आघाडी वाढवली. सलग सहा गुणांसह सायनाने दुसरा गेम जिंकत बरोबरी केली.

तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये ३-३ अशी बरोबरी होती. सायनाने जिद्दीने खेळ करत ६-३ व त्यानंतर ८-५ अशी आघाडी मिळवली. विश्रांतीक्षणी सायनाकडे ११-१० अशी आघाडी होती. सनने १४-१५ अशी पिछाडी भरून काढली. शरीरवेधी स्मॅशच्या प्रभावी अस्त्रासह सायनाने ४ गुणांची आघाडी घेतली. मग २०-१७ अशी आघाडी असताना सनने दोन मॅचपॉइंट वाचवले. मात्र सनचा पुढचा फटका नेटवर आदळला व सायनाने विजयी जल्लोष साजरा केला.

 

पंतप्रधानांकडून कौतुक

ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायना नेहवालचे अभिनंदन केले आहे. ‘‘दिमाखदार विजयाकरिता सायनाचे मन:पूर्वक अभिनंदन. समस्त देशवासीयांना तुझा अभिमान वाटतो,’’ असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मोदी यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह असंख्य व्यक्तींनी सायनावर शुभेच्छांचा वर्षांव केला आहे.

 

सायनाला दहा लाखांचे बक्षीस

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवालला भारतीय बॅडमिंटन संघटनेने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ‘‘सायनाचे मनापासून अभिनंदन. सायनाच्या यशाने अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रेरणा मिळेल याची खात्री आहे,’’ असे भारतीय बॅडमिंटन असासिएशनचे अध्यक्ष अखिलेश दासगुप्ता यांनी सांगितले.

सायनाने संथ सुरुवात केली, मग मात्र तिने आक्रमक खेळ केला. तिला सामना जिंकायचाच होता. तिची जिद्द वाखाणण्यासारखी होती. खेळात आणखी सुधारणा होऊ शकते. पण प्रदीर्घ कालावधीनंतर मिळवलेले जेतेपद तिचा आत्मविश्वास उंचावणारे आहे. कोर्टवरचा तिचा वावर वेगवान झाला आहे. ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर ही सकारात्मक गोष्ट आहे.

-विमल कुमार,  सायनाचे प्रशिक्षक