लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने दुखापत आणि थकव्यामुळे सय्यद मोदी इंडियन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. शेनझान, चीन येथे झालेल्या सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत खेळून सायना नुकतीच भारतात परतली. पण गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नसतानाही सायना या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्याने खेळत असल्यामुळे सायना भारतात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. संयोजकांच्या आग्रहास्तव सायनाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या फेरीत तिची लढत रशियाच्या सेमिआ पोलिकारपोव्हाशी होती.
या लढतीत सायनाने पहिला गेम २१-१७ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही ती २०-१८ अशी आघाडीवर होती. या गेमवर कब्जा करत सामना जिंकण्याची सायनाला संधी होती. मात्र गुडघ्याची दुखापत आणि थकव्याचे कारण देत सायनाने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. गुडघ्याची दुखापत सामनादरम्यान आणखी बळावल्याचे सायनाने सांगितले.
या स्पर्धेत खेळण्याची मनापासून इच्छा होती. मात्र आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा कार्यक्रम लक्षात घेऊन माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे सायनाने सांगितले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही आयत्या वेळी सायनाने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. सायनाच्या माघार घेण्याच्या निर्णयामुळे संयोजक आणि सायनाच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.