भारताची ‘फुलराणी’ म्हणून ओळख असलेली महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला अखेर विजयाचा सुर गवसला आहे. सायनाने रविवारी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबतच्या अटीतटीच्या लढाईत सायना नेहवाल हिने २२-१०, २२-१० असा रोमांचक विजय प्राप्त केला. गेल्या वर्षभरात गंभीर दुखापतींचा सामना करणाऱया सायनाने अखेर दुखापतींवर मात करून यंदाच्या वर्षात झोकात पुनरागमन केले आहे. गंभीर दुखापतीतूनही पुनरागमन करता येते याची प्रचिती देत सायनाने अंतिम फेरीत अफलातून कामगिरी केली.

सायनाने पहिल्या गेममध्ये २२-२० असा विजय प्राप्त केला होता. त्यानंतर दुसऱया गेममध्ये देखील सायना दमदार कामगिरी करत २०-१६ अशी आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या क्षणी चोकयूवाँग हिने खणखणीत स्मॅश आणि चांगले प्रत्युत्तर देत सामना २०-२० असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याला रोमांचक वळण प्राप्त झाले होते. सायनाने आपला संयम कायम राखत सरतेशेवटी दुसऱया गेममध्ये देखील २२-२० असा विजय प्राप्त करून जेतेपदावर नाव कोरले. विशेष म्हणजे, पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबत सायनाचा हा पहिलाच सामना होता आणि यात भारतीय बॅडमिंटनपटूने विजय साजरा केला आहे.

सायनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात यिप प्युई यिनवर २१-१३, २१-१० असा विजय मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सायनाने पाचव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले होते. जागतिक क्रमवारीत ६७ व्या क्रमांकावर पोर्नपावे चोकयूवाँगने १९ जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी असलेल्या चेऊंग यीला २१-१९, २०-२२, २१-१८ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. सायनाने मलेशियन स्पर्धा जिंकून १ लाख २० हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद गाठून आत्मविश्वास द्विगुणीत झालेली सायना यापुढेही आपली कामगिरी अशीच सुरू ठेवेल अशी आशा आहे.