ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांच्याकडून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मला पदकांची आशा आहे, असा आत्मविश्वास भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केला. जकार्ता येथे १० ते १६ ऑगस्टदरम्यान जागतिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
भारतीय खेळांडूच्या तयारीविषयी गोपीचंद म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंना जागतिक क्रमवारीत कोणते स्थान आहे हे महत्त्वाचे नाही. ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची असून त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यावरच आमच्या खेळाडूंचा भर राहील. पदक मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू आमच्या संघात आहेत, मात्र या खेळाडूंनी पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत खेळले पाहिजे. प्रत्यक्ष सामन्याचा दिवस महत्त्वाचा असतो. त्या दिवशी तुमची कामगिरी कशी होते यावरच तुमचे यशापयश अवलंबून असते. या स्पर्धेसाठी सराव शिबिरात खेळाडूंची चांगली तयारी झाली आहे. सायना व श्रीकांत यांच्याबरोबरच पारुपल्ली कश्यप, पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांच्याकडूनही मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रणोय हा दुखापतीमधून नुकताच तंदुरुस्त झाला आहे. त्याच्या सहभागाबाबत व तयारीविषयी मला खात्री आहे.’’
कश्यपबाबत गोपीचंद म्हणाले, ‘‘मला त्याच्या तंदुरुस्तीविषयी साशंकता आहे. त्याला दम्याचा त्रास होत असतो. मात्र प्रत्यक्ष कोर्टवर तो आपल्या आजारपणाचे कोणतेही लक्षण दाखवीत नाही व संपूर्ण ताकद लावून तो खेळत असतो. सध्या तो अतिशय अव्वल दर्जाचा खेळ करीत आहे.’’
सिंधूच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामधून ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. त्यानंतर तिने एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही भाग घेतला होता. मात्र तिला अपेक्षेइतके यश मिळाले नव्हते. तिच्याविषयी गोपीचंद म्हणाले, ‘‘सरावापासून ती तीन महिने दूर होती. त्यामुळे तिच्याकडून सर्वोत्तम यश अपेक्षित नाही. मात्र स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका अनुकूल लाभली तर ती खूप चांगले यश मिळवू शकेल. श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील आव्हान मोठे असते हे ओळखून त्याप्रमाणे आपल्या शैलीत थोडासा बदल करण्याची आवश्यकता आहे.’’