भारतीय खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाने आत्मविश्वास उंचावलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांच्यापुढे आता लक्ष्य आहे ते मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाचे. या स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना मंगळवारी प्रारंभ होत आहे.
नवी दिल्ली येथे रविवारी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर सायना व श्रीकांत या दोघांनीही मलेशियाकडे कूच केली आहे. या स्पर्धेतील त्यांचे पहिले सामने बुधवारी होणार आहेत. जागतिक क्रमवारीत सायनाच्या अव्वल स्थानावर गुरुवारी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होणार आहे. सायनाला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या मारिया कुसुमस्तुती हिच्याशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर तिची थायलंडच्या बुसानन ओंग्बुम्रंगपन हिच्याशी लढत होईल. हे दोन्ही अडथळे पार केल्यानंतर सायनाला चीनच्या ताईत्झू यिंग (चायनिज तैपेई) हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्यानंतर तिच्या मार्गात चीनच्या ली झुईरुई व वाँग यिहान यांचा अडथळा असणार आहे.
श्रीकांतला पहिल्याच फेरीत २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उपविजेता खेळाडू राजीव ओसेफ (इंग्लंड) याचे आव्हान आहे. श्रीकांतने गतवर्षी जागतिक स्पर्धेत राजीवला पराभूत केले होते, ही श्रीकांतसाठी मनोधैर्य उंचावणारी गोष्ट आहे. त्याच्याविरुद्ध विजय मिळविला तर श्रीकांतला १६व्या मानांकित तियान हौवेई (चीन) याच्याशी खेळावे लागणार आहे.
एच.एस.प्रणॉय याला पहिल्या फेरीत आर्यलडच्या स्कॉट इव्हान्सबरोबर खेळावे लागणार आहे. राष्ट्रकुल विजेता पारुपल्ली कश्यप याला पहिल्या फेरीत कोरियाच्या ली दोंग किवान याच्याशी लढत द्यावी लागेल.
महिलांच्या दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत केशया नुव्रिता हनादिया व देवीतिका पेर्मतासरी यांच्याशी झुंजावे लागणार आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री व बी.सुमेध रेड्डी यांना इंडोनेशियाच्या आंद्रे अदिस्तिया व हेंद्रा अपरिदा गुणावान यांचे आव्हान असेल.

‘‘गेल्या तीन महिन्यांमध्ये मी तीन स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येक लढतीमधून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. कोणतीही स्पर्धा मी दुय्यम मानलेली नाही. प्रत्येक खेळाडू जय्यत तयारीनिशी भाग घेत असतो व आपल्यालाही भक्कम तयारी करावी लागते.’’
-सायना नेहवाल

‘‘नवी दिल्लीतील विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. तीच विजयी मालिका पुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.’’
-किदम्बी श्रीकांत