भारताच्या साकेत मायनेनीने व्हिएतनाम खुल्या टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांना पराभवाचा धक्का बसला. चौथ्या मानांकित साकेतने स्पेनचा बिगरमानांकित खेळाडू गेर्रार्ड ग्रॅनोलर्सचे आव्हान ६-४, ७-६ (७-३) असे संपुष्टात आणले. पहिल्या सेटमध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत सव्‍‌र्हिस ब्रेक केली. या ब्रेकच्या आधारे त्याने हा सेट घेतला. पाठोपाठ त्याने दुसऱ्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक करीत ४-१ अशी आघाडी मिळवली; परंतु गेर्रार्डने चार गेम्स जिंकत ५-५ अशी बरोबरी साधली. हा सेट टायब्रेकपर्यंत गेला. त्यामध्ये साकेतने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवले आणि सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘‘हा सामना खूप रंगतदार झाला व मला विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. मात्र या सामन्यातील खेळाबाबत मला समाधान आहे,’’ असे साकेतने सामना जिंकल्यानंतर सांगितले.