ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाई विजेता बजरंग पुनिया यांनी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताला पदक जिंकून देण्याचा निर्धार केला आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सर्वाचे लक्ष रिओ ऑलिम्पिकमध्ये ५८ किलो गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीकडे असेल. मे महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने ६० किलो वजनी गटात प्रतिनिधित्व करून रौप्यपदकाची कमाई केली होती. याच वजनी गटातून ती जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरली असून, महिला कुस्ती स्पर्धेतील तिची लढत गुरुवारी होणार आहे.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी विनेश फोगट महिलांच्या ४८ किलो वजनी गटात आपले नशीब आजमावणार आहे. तिने आशियाई पदक ५५ किलो वजनी गटात जिंकले होते. मात्र रिओ ऑलिम्पिकच्या दुखापतीतून सावरल्यानंतर २२ वर्षीय विनेशने ४८ किलो वजनी गटालाच पसंती दिली आहे.

विनेश वगळता कोणत्याही फोगट भगिनीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतलेला नाही. गीता आणि बबिता निवड चाचणीत सहभागी झाल्या नाहीत, तर रितू आणि संगीता पात्रता स्पर्धेत अपयशी ठरल्या.

बुडापेस्ट येथे २०१३मध्ये झालेल्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक साद घालते आहे. बुडापेस्ट येथे बजरंग ६० किलो वजनी गटात सहभागी झाला होता. मात्र सध्या तो ६५ किलो गटात खेळत आहे. आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच्याकडून देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी झालेल्या निवड चाचणी लढतीत बजरंगने राहुल मानला १०-० असे हरवले होते.

याशिवाय ऑलिम्पिकपटू संदीप तोमर ५७ किलो वजनी गटात गेल्या काही वर्षांत सातत्याने कामगिरी दाखवत आहे. जागतिक अजिंक्यपद जिंकण्याचा निर्धार संदीपने केला आहे. याचप्रमाणे अर्जुन पुरस्कार निश्चित झालेला सत्यवर्त कडियान (९७ किलो), अमित धानकर (७० किलो) आणि प्रवीण राणा (७४ किलो) यांच्याकडून भारताला पदकाच्या आशा धरता येतील. या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत ग्रीको-रोमन स्पर्धा होणार असून, यात आठ खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

भारतीय संघ-

  • पुरुष फ्रीस्टाइल : संदीप तोमर (५७ किलो), हरफूल (६१ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), अमित धानकर (७० किलो), प्रवीण राणा (७४ किलो), दीपक (८६ किलो), सत्यवर्त कडियान (९७ किलो), सुमित (१२५ किलो)
  • महिला कुस्ती : विनेश फोगट (४८ किलो), शीतल (५३ किलो), ललिता (५५ किलो), पूजा धनडा (५८ किलो), साक्षी मलिक (६० किलो), शिल्पी (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो), पूजा (७५ किलो)
  • ग्रीको रोमन : ग्यानेंदर (५९ किलो), रविंदर (६६ किलो), योगेश (७१ किलो), गुरप्रीत सिंग (७५ किलो), हरप्रीत सिंग (८० किलो), रवींदर खत्री (८५ किलो), हरदीप (९८ किलो), नवीन (१३० किलो)