रिऑ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक आता लवकरच वैवाहिक जीवनाच्या आखाड्यात उतरणार आहे. साक्षी मलिक हिचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्यासोबत विवाह निश्चित झाला आहे. गेल्याच वर्षी साक्षीने लवकरच आपण विवाह करणार असल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. पण त्यावेळी साक्षीने आपल्या होणाऱया ‘अहों’चे नाव जाहीर केले नव्हते. अखेर साक्षी आणि सत्यव्रत यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली.

साक्षीने आपल्या फेसबुक पेजवर सत्यव्रतसोबतचा एक फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली. येत्या २ एप्रिलला दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नपत्रिका देखील वाटून झाल्याची माहिती खुद्द साक्षीने दिली आहे. साक्षीलच्या लग्न सोहळ्यात क्रीडा क्षेत्रासह राजकीय इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साक्षी तिच्या लग्नात सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यासची मुखर्जी तिचा ड्रेस डिझाईन करणार आहे.

गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. साक्षी आणि सत्यव्रत यांची प्रेमकहाणी तशी खूप आधीपासून सुरू होती. आखाड्यात कुस्तीचे धडे घेता घेता साक्षी सत्यव्रतच्या प्रेमात पडली होती. साक्षीपेक्षा एका वर्षाने लहान असलेला सत्यव्रत हरियाणाच्या रोहतकमध्ये आखाडा चालवणाऱया कुस्तीपटू सत्यवान यांचा मुलगा आहे. सत्यवान यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सत्यवान यांच्या आखाड्यातच साक्षी आणि सत्यव्रत यांची ओळख झाली होती.