बंगाल स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद महाराष्ट्र राज्य मानांकन स्पर्धेत पुरुष एकेरी विभागात माजी आशियाई आणि राष्ट्रीय विजेता संदीप देवरुखकर आणि महिला एकेरीमध्ये मैत्रेयी गोगटे यांनी अजिंक्यपद पटकावले. पुरुषांच्या अटीतटीच्या अंतिम लढतीत संदीपने पंकज पवारवर १७-२५, २५-५, २५-१३ असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. महिलांमध्ये मैत्रेयीने मुंबईच्या आसावरी जाधवचा २५-८, २५-५ असा धुव्वा उडवत विजेतेपदाला गवसणी घातली. महिलांच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ऊर्मिला शेंडगेने अनुपमा केदावर यांच्यावर १०-२५-२५-८, २५-१३ असा विजय मिळवला. पुरुषांच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये रहिम खानने वसंत वैराळला २५-१०, २५-८ असे सहज पराभूत केले.