यंदाच्या हंगामातला अफलातून फॉर्म कायम राखत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने चीन खुल्या टेनिस स्पर्धेतही अंतिम फेरीत धडक मारली. एकत्रित खेळताना हंगामातील आठवे जेतेपद पटकावण्यापासून ही जोडी केवळ एक विजय दूर आहे.
अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने एक तास आणि सहा मिनिटे चाललेल्या लढतीत चीनच्या चेन लिआंग आणि याफान वांग जोडीवर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला.
काही दिवसांपूर्वीच वुहान स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने चीनच्या जोडीला निष्प्रभ केले. या जोडीने पाच वेळा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदण्यात यश मिळवले.
कॅसे डेलाअ‍ॅक्वा-यारोस्लोव्हा श्वेडोव्हा आणि हाओ चिंग चान-युंग जॅन चान यांच्यातील विजेत्या जोडीशी सानिया-मार्टिनाचा अंतिम लढतीत मुकाबला होणार आहे.
सानिया-मार्टिना जोडीने यंदाच्या हंगामात विम्बल्डन आणि अमेरिकन खुली स्पर्धा या ग्रँड स्लॅमसह इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, गुआंगझु आणि वुहान स्पर्धाच्या जेतेपदांवर कब्जा केला. शेवटच्या तीन स्पर्धामध्ये या जोडीने एकही सेट न गमावता जेतेपदापर्यंत वाटचाल केली होती.