भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपल्या साथीदारांसह अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

अव्वल मानांकित सानिया आणि मार्टिना हिंगीस जोडीने महिला दुहेरीमध्ये टायमिया बॅकसिनस्की (स्वित्र्झलड) आणि चिया-जंग च्युआंग (चायनिज तैपेई) यांच्याविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवला. जुलै महिन्यात बिम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने एक तास चाललेली ही लढत ६-१, ६-१ अशी आरामात जिंकली.
आता सानिया-मार्टिना जोडीची १३व्या मानांकित मिखेला क्रेजिसेक (नेदरलँड्स) आणि बाबरेरा स्ट्रायकोव्हा (चेक प्रसाजसत्ताक) जोडीशी पुढील फेरीत गाठ पडणार आहे. भारत-स्वित्र्झलडच्या जोडीगोळीने १८ बिनतोड सव्‍‌र्हिस केल्या.
पुरुषांच्या दुहेरी विभागात सहाव्या मानांकित रोहन बोपण्णा (भारत) आणि फ्लोरिन मर्गीआ (रोमानिया) जोडीने एक तास आणि २६ मिनिटे चाललेल्या लढतीत मारिस फिरस्टेनबर्ग (पोलंड) आणि सांतियागो गोन्झालिझ (मेक्सिको) जोडीचा ६-३, ७-६ (४/७) असा पराभव केला. आता रोहन-फ्लोरिन जोडी पुढील फेरीत नवव्या मांनाकित डॅनियल नेस्टर (कॅनडा) आणि एडॉर्ड रॉजर-व्हॅसेलिन (फ्रान्स) जोडीशी झुंजणार आहे.
शनिवारी सानिया आणि तिचा साथीदार ब्रुनो सोआरिस यांना मिश्र दुहेरीतील पहिल्याच फेरीत अपयश आले. तसेच लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी फर्नाडो व्हर्डास्को (स्पेन) ही जोडीसुद्धा पराभूत झाली होती.