भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक टेनिस स्पध्रेत महिला दुहेरीत जेतेपदाला गवसणी घातली. सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअ‍ॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.

सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. या स्पध्रेत सानियाने तिजी माजी जोडीदार मार्टिना हिंगीस व कोको व्हँडेवेगे जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव केला होता. मात्र, अमेरिकन खुल्या स्पध्रेत सानिया-बाबरेरा जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पध्रेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४ मध्ये येथे अजिंक्यपद पटकावले होते. गतवर्षी सानियाने या स्पध्रेतून माघार घेतली होती.

सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या जेतेपदाचाही समावेश आहे. तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पध्रेतही बाजी मारली. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.

 

वेलवन सेंथीकुमारला अजिंक्यपद

क्वालालम्पूर : भारताचा युवा स्क्वॉशपटू वेलवन सेंथीकुमारने क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेत १९-वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटकावले. अंतिम लढतीत वेलवनने ०-२ अशा पिछाडीवरुन दमदार पुनरागमन करताना जॉर्डनच्या मोहम्मद अल-सराजवर १२-१४, ९-११, ११-६, ११-८, ११-७ असा धमाकेदार विजय मिळवला.

चेन्नईचा हा खेळाडू भारतीय स्क्वॉश अकादमीत (आयएसए) सराव करत असून आशियाई स्पध्रेत अजिंक्यपद पटकावणारा रवी दीक्षित (२०१०) यांच्यानंतर दुसरा खेळाडू आहे. दुसरे मानांकन असलेला वेलवन या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार होता. मात्र, चौथ्या मानांकित सराजने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि कनिष्ठ विश्वविजेत्या मलेशियाच्या एनजी इयन योवचा पराभव करून खळबळ माजवली. त्यामुळे त्याच्याकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा होती.