ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत खेळण्यासाठी उत्सुक असून इतर सहकाऱ्यांसोबत स्पध्रेत चांगल्या कामगिरीची आशा भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केली.

‘‘शनिवारी कॅनडाला रवाना होणार आहे आणि तेथून थेट रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत दाखल होईन. भारताचे सर्वात मोठे पथक यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. आम्ही सर्वच उस्तुक आहोत आणि आशा करतो की चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ,’’ असे मत सानियाने व्यक्त केले. रिओमध्ये सानिया महिला दुहेरीत प्रार्थना ठोंबरेसह, तर मिश्र दुहेरीत रोहन बोपन्नासह खेळणार आहे.

 

*****************************************************

 

क्रिष्णन यांचा विक्रम लिएण्डरला खुणावतोय

कोलकाता, पीटीआय

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएण्डर पेस हा दुसरे ऑलिम्पिक पदक पटकावण्यासाठी उत्सुक असला तरी त्याला रामनाथन क्रिष्णन यांचा डेव्हिस चषक स्पध्रेत एकेरीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही खुणावत आहे. ४३ वर्षीय पेस पुढील महिन्यात सातव्या ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी होणार आहे. डेव्हिस चषक स्पध्रेत लिएण्डरच्या नावावर एकेरीत ४८, तर दुहेरीत ४२ विजय आहेत. रामनाथन यांनी एकेरीत ५०, तर दुहेरीत १९ विजय नोंदवले आहेत.

‘दुसरे ऑलिम्पिक पदक हे लिएण्डरचे अनेक ध्येयांपैकी एक ध्येय आहे. त्याचबरोबर विश्व दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद आणि रामनाथन क्रिष्णन (५०) यांचा विक्रम मागे टाकण्याचे लक्ष्य त्याने डोळ्यासमोर ठेवले आहे,’’ अशी माहिती लिएण्डरचे वडील डॉ. वेस पेस यांनी दिली.

लिएण्डर एकेरी प्रकारात सहभाग घेत नाही, याबाबत विचारले असता वेस म्हणाले, ‘बरीच वष्रे झाली तो एकेरीत खेळलेला नाही, परंतु त्याने ध्येय निश्चित केले आहे. चंदिगडमध्ये झालेल्या डेव्हिस चषक स्पध्रेत एकेरीत त्याची खेळण्याची इच्छा होती, परंतु त्याने माघार घेतली. त्याने ऑलिम्पिकवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.’