अटीतटीच्या लढतीत जपानविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या भारतीय हॉकी संघाने मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या लढतीत भारत आणि जपान यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
भारताचा कर्णधार सरदार सिंग याने पहिल्या लढतीतील कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना पुढील सामन्यांत संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जपानच्या दीर्घ पास करण्याची आणि प्रतिस्पर्धी संघाच्या जागेवर हल्लाबोर करण्याची व्यूहरचना भेदण्याचे आव्हान भारताला सक्षमपणे पेलावे लागणार आहे. पेनल्टी कॉर्नरमध्ये पाहुण्यांपेक्षा भारताकडे मजबूत फळी आहे. व्ही. आर. रघुनाथ, बिरेंद्र लाक्रा आणि सरदार यांच्याकडे पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याची कौशल्य आहे. दुसरीकडे जपानला पहिल्या सामन्यात मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले होते. गोलरक्षक पीआर श्रीजेश याचे भक्कम क्षेत्ररक्षण त्यांना भेदता आले नव्हते. मात्र, मंगळवारच्या लढतीत दोन्ही संघ नव्या रणनीतीने मैदानावर उतरतील.

पहिल्या लढतीत आम्हाला साजेसा खेळ करता आला नाही. मी याआधीही म्हणालो आहे, क्रमवारी पाहू नका. जपान आशियातील चांगला संघ आहे आणि ते युरोपियन शैलीने खेळतात.
– पॉल व्ॉन अ‍ॅस,
भारताचे प्रशिक्षक