भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिला हॉकी खेळाडूने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगने खंडन केले. ‘‘त्या महिलेला मी ओळखतो, परंतु तिला मी मारहाण केलेली नाही. हे गंभीर आरोप असून योग्य वेळी याचे सणसणीत उत्तर देईन,’’ असे सरदार म्हणाला.
२१ वर्षीय अशपाल कौर भोगलने लुधियाना पोलीस ठाण्यात सरदारविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सरदारसह गेल्या चार वर्षांची ओळख आहे. त्याने आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचा दावा अशपालने केला आहे. सरदारने इच्छा नसताना मला गर्भपात करायला भाग पाडले आणि त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याचेही अशपाल म्हणाली.
हॉकी इंडिया लीगवर सरदारने लक्ष केंद्रित केले आहे आणि तो जयपी पंजाब वॉरियर्सचे नेतृत्व करत आहे. ‘‘सध्या माझे सर्व लक्ष हॉकी इंडिया लीगवर आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर या आरोपांची माहिती मला मिळाली. हे खूप गंभीर आरोप आहेत. माझ्या वकिलाशी सल्लामसलत करून त्यांना उत्तर देईन. मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, परंतु त्यासाठी मला वेळ हवा,’’ असे सरदारने सांगितले. त्या महिलेशी तुझे संबंध होते का, या प्रश्नावर सरदारने त्वरित नकार दिला. तो म्हणाला, ‘‘आमच्यात असे काही घडलेच नाही.’’

तक्रारीतील ठळक मुद्दे
* २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सरदारसोबत भेट
* २०१४च्या विश्वचषक स्पध्रेत सरदारने प्रेमाची कबुली दिली
* सरदारच्या गावी जाऊन घरच्यांशी भेट
* गेली चार वष्रे संबंध आणि २०१५मध्ये गर्भपात करण्यास भाग पाडले.
* गर्भपात करण्यासाठी मानसिक छळ