अझारेन्का, मरे, फेडरर यांचे आव्हान कायम
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस
सेरेना विल्यम्स, व्हिक्टोरिया अझारेन्का व अँडी मरे या संभाव्य विजेत्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले. मात्र सेरेनास झालेल्या दुखापतीने संयोजक चिंताग्रस्त झाले आहेत.
कारकिर्दीत एकाच वर्षांत चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेनाने एडिना गॅलोविट्स-हॉल हिच्यावर ६-०, ६-० असा ५४ मिनिटांत फडशा पाडला. सामना सुरू झाल्यानंतर १९ मिनिटे होत नाही तोच सेरेनाच्या उजव्या पायाचा घोटा दुखावला. त्यावर उपचार घेतल्यानंतर ती पुन्हा मैदानात आली आणि अविस्मरणीय खेळ करीत विजय मिळविला. जणुकाही आपली दुखापत गंभीर नाही याचाच प्रत्यय तिने घडविला.
अझारेन्काने रशियाच्या मोनिका निक्युलेस्क्यु हिचा ६-१, ६-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये ०-३ अशा पिछाडीवरून बहारदार खेळ करीत तिने विजयश्री खेचून आणली. कॅरोलीन वोझ्नियाकी हिला जर्मनीच्या सॅबिनी लिसिकी हिच्याविरुद्ध विजय मिळविताना तीन सेट्सपर्यंत झुंजावे लागले. जपानची ४२ वर्षीय खेळाडू किमिको डाटे-क्रुम हिने १२ व्या मानांकित नादिया पेद्रोवा हिला पराभूत करीत ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेतील मुख्य फेरीत विजय मिळविणारी ती सर्वात प्रौढ खेळाडू आहे. तिने हा सामना ६-२, ६-० असा जिंकला. माजी विम्बल्डन विजेती पेत्रा क्विटोवाने आव्हान राखले मात्र इटलीची सातवी मानांकित खेळाडू सारा इराणी हिला पराभवाचा धक्का बसला. कार्ला सुरेझ नाव्हरो हिने तिच्यावर सनसनाटी विजय मिळविला.
माजी विजेत्या रॉजर फेडरर याने अव्वल दर्जाचा साजेसा खेळ करीत फ्नान्सच्या बिनोईट पेअरी याच्यावर दणदणीत विजय मिळविला. हा सामना त्याने ६-२, ६-४, ६-१ असा जिंकला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. रॉड लिव्हर स्टेडियमवरील सामन्यात अँडी मरे याने नेदरलँड्सच्या रॉबिन हास याच्यावर ६-३, ६-१, ६-३ असा सफाईदार विजय मिळविला. फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा या अनुभवी खेळाडूने आपलाच सहकारी मायकेल लोड्रा याचे आव्हान ६-४, ७-५, ६-२ असे संपुष्टात आणले. जुआन मार्टिन डेल पोटरे यानेही सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला. त्याने आद्रियन मॅनारिनो याचा ६-१, ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. फ्नान्सच्या गेल मोम्फिल्स याला मात्र अ‍ॅलेक्झांडर डोल्गोपोलोव्ह याच्यावर विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. हा सामना त्याने ६-७ (७-९), ७-६ (७-४), ६-३, ६-३ असा जिंकला.