सौरभ वर्मा व ऋतुपर्णा दास या दोन्ही अग्रमानांकित खेळाडूंना व्ही.व्ही.नातू चषक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. त्या तुलनेत सायली गोखले व तन्वी लाड यांनी दुसऱ्या फेरीत सहज विजय मिळविला.
सौरभला दीपक खत्रीने चांगली लढत दिली. अनुभवाच्या जोरावर सौरभने हा सामना २३-२१, २१-१४ असा जिंकला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. चौथ्या मानांकित बी.साईप्रणीत याने दिल्लीच्या सचिन रावतवर २१-१२, २१-१२ असा सहज विजय मिळविला. त्याने ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. पेट्रोलियमच्या अजय जयरामचे आव्हान २१-७, २१-१४ असे संपुष्टात आणले.
महिलांच्या गटात अग्रमानांकित ऋतुपर्णाला रेल्वेच्या चित्रा लेखाने शेवटपर्यंत झुंज दिली. चुरशीने झालेला हा सामना १८-२१, २१-८, २१-१७ असा जिंकत ऋतुपर्णा हिने तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या गेममध्ये ऋतुपर्णाने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. एअर इंडियाकडून खेळणाऱ्या तन्वी लाड व सायली गोखले या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही.
तन्वीने करिश्मा वाडकरचा २१-१२, २१-१५ असा पराभव केला. सायलीने महाराष्ट्राच्या चारुता वैद्यच्यावर २१-९, २१-९ असा सफाईदार विजय मिळविला.