सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने बुधवारी ‘बीसीसीआय’ला फटकारले. लोढा समितीने सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी ‘बीसीसीआय’ने करावी, अन्यथा तसे बदल करण्यासाठी आम्हाला भाग पाडावे लागेल, असा इशारा सुप्रीम कोर्टाने ‘बीसीसीआय’ला दिला आहे.

‘बीसीसीआय’ जर स्वत:ला कायद्यापेक्षा मोठं समजत असेल तर ती त्यांची चूक आहे, आदेशांची अंमलबजावणी कशी करून घ्यायची हे कोर्टाला चांगलं माहित आहे. त्यामुळे दिलेल्या आदेशांचे पालन करा, अन्यथा आम्हाला तसे करण्यास भाग पाडावे लागेल, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी ‘बीसीसीआय’ला फटकारले. ‘बीसीसीआय’च्या कारभारात सुचवलेल्या सुधाणांसंबंधीचा अहवाल लोढा समितीने आज सुप्रीम कोर्टात सादर केला.

वाचा: ऑक्टोबपर्यंत शिफारशींची अंमलबजावणी करा

‘बीसीसीआय’ सुचविलेल्या बदलांवर सकारात्मक पद्धतीने काम करत नसल्याचे लोढा समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याशिवाय ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांना पदावरून हटविण्याचेही लोढा समितीने अहवालात म्हटले आहे. त्यास ‘बीसीसीआय’ने कडाडून विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टाने ‘बीसीसीआय’च्या या भूमिकेवर आक्षेप घेत लोढा समितीने सुचविलेल्या बदलांबाबत उत्तर देण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्याच्या मार्गात बीसीसीआय अडथळा आणत असल्याचेही समितीने अहवालात म्हटले आहे. लोढा समितीने आज सादर केलेल्या या अहवालामुळे आता बीसीसीआयच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा: बीसीसीआयची विनंती लोढा समितीने फेटाळली