लाल मातीने रंगलेले नागमोडी रस्ते.. दुतर्फा पसरलेली वनराई, माडांची बने, पोफळीच्या बागा, टुमदार कौलारू चिऱ्याची घरे.. लांबलचक मालवणचा समुद्र किनारा, पांढऱ्या वाळूत किल्ला बांधण्यासाठी व्यस्त असलेले चिमुकले हात.. फेसाळणाऱ्या लाटा, मंद वाहणारी हवा अल्हाददायक धुके, किनाऱ्यावर एका बाजूला चाललेली मासेमारी, निरनिराळे मासे, कुठे काजू तर कुठे खाज्याचा खमंग सुगंध आणि कधी एकदा समुद्रातील शर्यतीला पोहायला उतरतोय, अशी उत्सुकता असलेल्या स्पर्धकांनी मालवणनगरी दुमदुमून गेली होती आणि याला कारण होते ते सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित चिवला समुद्रामध्ये रंगणाऱ्या पाचव्या जलतरण शर्यतीचे. ही शर्यत रविवारी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.
सध्याच्या घडीला मालवण फुलून गेले आहे ते क्रीडा रसिकांनी, सारे काही जलतरणमय झालेले आहे. मालवण तिठय़ापासून ते एस.टी डेपोपर्यंत चर्चा आहे ती फक्त आणि फक्त जलतरण शर्यतीतीच. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण १४०० अर्ज आले असून एकूण ११८४ स्पर्धकांची अधिकृत नोंदणी झाली आहे. यामध्ये ८५० मुलांसहित २९० मुलींचा सहभाग आहे, त्याचबरोबर ४४ अपंग स्पर्धकांनीही या शर्यतीमध्ये भाग घेतला आहे. ही स्पर्धा विविध ६ ते ७५ या विविध वयोगटांमध्ये होणार आहे.
या शर्यतीमध्ये एकूण २३ जिल्ह्यांनी सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये २१ संलग्न जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे सहभागी  झाले आहेत. ही स्पर्धा वयोगटांनुसार ५ किमी, ३ किमी, २ किमी, १ किमी आणि ५०० मीटर या गटांमध्ये होणार आहे.