भारतीय संघात परतण्यासाठी झगडणाऱ्या वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खानसाठी ही जणू अग्निपरीक्षाच ठरणार आहे. याचप्रमाणे भारत ‘अ’ संघालाही प्रतिष्ठा टिकविण्यासाठी बुधवारपासून सुरू होणारी तिसरी आणि अखेरची कसोटी मालिका जिंकणे आवश्यक आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने पहिली कसोटी जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरी कसोटी अनिर्णीत राहिली होती. त्यामुळे आता मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारत ‘अ’ संघाला तिसरी कसोटी जिंकणे क्रमप्राप्त आहे.
राष्ट्रीय संघात परतण्यासाठी सेहवाग आणि गंभीरला आपल्या बॅटची चुणूक दाखवण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात या दोघांनी अनुक्रमे ७ आणि ११ धावा काढल्या होत्या. सेहवागने मागील ३० कसोटी डावांमध्ये शतक झळकावलेले नाही. तथापि, गंभीरलाही जानेवारी २०१० नंतर ४० कसोटी डावांमध्ये कसोटी शतक साकारता आलेले नाही.
निवड समितीचे लक्ष वेधू पाहणाऱ्या वेगवान गोलंदाज झहीर खानसाठीही दुसरी कसोटी अनुकूल ठरली नव्हती. त्याच्या खात्यावर फक्त ९३ धावांत २ बळी होते. शिमोगाची खेळपट्टी संथ होती. याशिवाय एका वर्षांच्या अंतराने तो कसोटी खेळल्यामुळे त्याला पुरेसे यश मिळू शकले नाही.
ऑक्टोबर २०१०नंतर झहीरला कसोटी डावात पाच बळी घेण्याची कामगिरी एकदाही करता आलेली नाही. त्याची तंदुरुस्ती हा नेहमीच चिंतेचा विषय ठरत आला आहे. २०११च्या विश्वचषक स्पध्रेनंतर झहीर फक्त सात कसोटी सामने खेळला आहे.
भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराही चांगल्या धावा काढून संघाला प्रेरित करण्यासाठी उत्सुक आहे. दोन कसोटी सामन्यांतील तीन डावांमध्ये त्याला फक्त ४५ धावाच करता आल्या आहेत.