आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेल्या भारताच्या संभाव्य संघात वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांना स्थान मिळाले नसले तरी त्याचे कोणतेही दडपण न घेता या दोन्ही खेळाडूंनी नवी दिल्ली संघाच्या सरावात गांभीर्याने भाग घेतला. नवी दिल्ली संघाचा पहिला रणजी सामना रविवारपासून नवी दिल्ली येथे सौराष्ट्रविरुद्ध होत आहे.  
दिल्ली संघाचे सराव शिबिर रोशनआरा क्लब मैदानावर सुरू आहे. वय आणि कामगिरीच्या दृष्टीने निवृत्तीकडे झुकलेले हे खेळाडू येथे फलंदाजीचा सराव करीत होते. तेव्हा त्यांच्याकडे फारसे कोणाचेही लक्ष नव्हते.
एके काळी प्रसिद्धीच्या झगमगाटात बुडालेले हेच खेळाडू होते अशी कोणाला कल्पनाही नसेल. सेहवाग आणि गंभीर यांच्या सहकाऱ्यांनी पांढरा ट्रॅकसूट घातला असला तरी या दोन्ही खेळाडूंनी रंगीत ट्रॅकसूट परिधान केला होता. त्यामुळेच की काय या दोन अव्वल खेळाडूंचा वेगळेपणा मैदानावर उठून दिसत होता.
सरावानंतर गंभीर म्हणाला, ‘‘विश्वचषक संघाबाबत मी कोणतेही मत व्यक्त करणार नाही. मी आमच्या दिल्ली रणजी संघाच्या सरावावर लक्ष केंद्रित करीत आहे. फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असली तरी मी गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीस प्राधान्य देईन. जर एखादा संघ आठशे धावा करूनही बाद फेरीसाठी पात्र होत नसेल तर फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टय़ा निरुपयोगी आहेत. रोशनआरा क्लबवरील खेळपट्टीवर मी पाच गोलंदाजांचा उपयोग करू शकतो. संघातील कनिष्ठ खेळाडूंना या सामन्यात संधी मिळणे अवघड असले तरी ड्रेसिंग रुममधील वातावरणाचा अनुभव त्यांना मिळावा हाच माझा हेतू आहे.’’