‘वीरेंद्र सेहवाग अफलातून माणूस आहे. सराव करत असताना योजनेनुसार गोलंदाजी होत नसेल तर तो आवर्जून सांगतो. कुठे सुधारणा करायला हवी याचेही मार्गदर्शन करतो. एक चांगला क्रिकेटपटू म्हणून घडण्यासाठी सेहवागची भूमिका महत्त्वाची आहे’, असे किंग्ज इलेव्हन पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सांगितले. भेदक गोलंदाजीच्या जोरावर संदीपने सलग दोन सामन्यांत सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.
‘वीरेंद्र सेहवागचा समावेश असलेल्या संघातून खेळायला मिळणे हे माझे भाग्य आहे. लहान असल्यापासून सेहवाग माझा आवडता फलंदाज आहे. त्याच्याबरोबर खेळायला आणि शिकायला मिळणे माझ्यासाठी बोनसच आहे’, असे त्याने पुढे सांगितले.
ज्या वेळी माझ्या गोलंदाजीवर खूप साऱ्या धावा होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कशी गोलंदाजी करावी याचे मार्गदर्शन लक्ष्मीपती बालाजी करतो. त्याच्याशी बोलल्यामुळे मी मानसिकदृष्टय़ा कणखर राहतो. एखाद्या सामन्यासाठी तयारी कशी करावी, परिस्थितीनुरूप डावपेच कसे बदलावेत हे मिचेल जॉन्सनकडून शिकत असल्याचे संदीपने सांगितले.