मुंबईत इंग्लंडविरुद्ध २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे धडाकेबाज भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या कसोटी कारकीर्दीचे शानदार शतक साजरे करणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात वीरूने दिमाखदार शतक झळकवावे, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटूंनी प्रकट केली आहे.
‘‘सेहवागसारख्या खेळाडूंमुळेच क्रिकेटरसिक कसोटी क्रिकेट पाहायला येतात. सेहवागने १००व्या कसोटी सामन्यात शतक साकारलेले मला पाहायचे आहे,’’ असे मत भारताला विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार कपिल देवने सांगितले.
अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल दोन वर्षांच्या अंतराने सेहवागने आपले कसोटी शतक साकारले होते. ‘नजफगढचा नवाब’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या सेहवागविषयी दिलीप वेंगसरकर म्हणाले की, ‘‘सेहवाग हा असामान्य क्रिकेटपटू आहे. तो स्वत:च्या शैलीमध्येच खेळतो. त्याच्या कारकीर्दीमध्येही काही खराब काळ आला. पण आपल्या आक्रमक वृत्तीच्या बळावर त्याने त्यावर मात केली आहे. कसोटी क्रिकेटमधील वीरूची आकडेवारी विलक्षण बोलकी आहे. मी त्याच्या फलंदाजीचा चाहता आहे. १००व्या कसोटी सामन्यात तो शतक साकारेल अशी माझीही इच्छा आहे.’’
सचिन तेंडुलकर (१९१), राहुल द्रविड (१६३), व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (१३४), अनिल कुंबळे (१३२), कपिल देव (१३१), सुनील गावस्कर (१२५), दिलीप वेंगसरकर (११६) आणि सौरव गांगुली (११३) या आठ भारतीय क्रिकेटपटूंनी शंभर कसोटी सामन्यांचा टप्पा आजमितीपर्यंत गाठला आहे. सेहवागने ९९ कसोटी सामन्यांत ८४४८ धावा काढल्या आहेत.