श्रीलंकेच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा ग्रॅहम फोर्ड यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असताना त्यांच्यापुढे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांचा पर्याय खुला होता. पण देशाचे प्रशिक्षकपद भूषवण्यासाठी जयवर्धने अननुभवी आहे, असे स्पष्ट मत मंडळाचे अध्यक्ष थिलांगा सुमथिपाला यांनी व्यक्त केले.

‘श्रीलंकेच्या संघाचे वरिष्ठ प्रशिक्षक भूषवण्याइतका अनुभव जयवर्धनेकडे नाही. त्याला आम्ही ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद देऊ शकतो,’ असे सुमथिपाला म्हणाले.

जयवर्धनेने श्रीलंकेचे कर्णधारपद भूषवले होते, त्याचबरोबर एक फलंदाज म्हणूनही त्याची ख्याती होती. २०१४ साली जयवर्धने आणि त्याला जवळचा संघ सहकारी कुमार संगकारा यांनी एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. या दोघांच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही.

जयवर्धनेकडे प्रशिक्षकपादाचा जास्त अनुभव नाही. सध्याच्या घडीला आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षकपद त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हे त्याचे मुंबई इंडियन्समध्ये पहिलेच वर्ष होते. पण या वर्षांत मुंबई इंडियन्सने त्याच्या प्रशिक्षकपदाखाली जेतेपदाला गवसणी घातली होती.