फुटबॉल विश्वाला हादरवणाऱ्या महाघोटाळ्याचा घटनाक्रम आणि संघटनेतील सहकाऱ्याच्या निलंबनाप्रकरणी फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आहेत. महाघोटाळा आणि अन्य मुद्यांच्या निमित्ताने शुक्रवारी ब्लॅटर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच फिफाचे सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. यासह महाघोटाळ्याशी संबंधित विविधांगी मुद्दे कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चेला आहेत. स्वित्र्झलडच्या कायदा मंत्रालयाने व्हेनेझुएलाच्या राफेल इस्क्वियुइल यांना अमेरिकेच्या ताब्यात सोपवले. मे महिन्यात महाघोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राफेलचा समावेश होता.
उरुग्वेचे फिफाचे उपाध्यक्ष युझेनी फिग्युरुडो यांच्या अमेरिकला प्रत्यार्पणाला स्वित्र्झलडने मान्यता दिली. याव्यतिरिक्त चार पदाधिकाऱ्यांविषयी येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. २०१४ विश्वचषक स्पर्धेच्या तिकीटांच्या काळाबाजारप्रकरणी कथित सहभागाप्रकरणी व्हाल्के यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान व्हाल्के यांनी आरोपांचा इन्कार केला आहे आणि याविरुद्ध लढा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.