जागतिक फुटबॉल संघटनेची माहिती

आठ वर्षांच्या बंदीमागची कारणे सेप ब्लाटर आणि मायकेल प्लॅटिनी यांना सांगण्यात आली असून याविरोधात दाद मागण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा आहे, अशी माहिती जागतिक फुटबॉल संघटनेच्या आचारसंहिता न्यायाधिकरणाने दिली.

ब्लाटर यांनी फिफाच्या नियमांचा भंग करून २०११ साली प्लॅटिनींना दोन कोटी डॉलर दिले होते. याविरोधात दोघांची चौकशी करण्यात आली आणि २५ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्यावर आठ वर्षांच्या बंदीचा निर्णय फिफाच्या स्वतंत्र आचारसंहिता समितीने घेतला. हा निर्णय कोणत्या पुराव्यांच्या आधारावर घेण्यात आला, याची माहिती ब्लाटर व प्लॅटिनी यांना शनिवारी देण्यात आली. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यात त्यांनी नकार दिला.

‘‘ब्लाटर आणि प्लॅटिनी या बंदीविरोधात फिफाच्या समितीसमोर दाद मागू शकतात. ही याचिका फेटाळली गेल्यास त्यांना क्रीडा लवादाकडे दाद मागता येईल,’’ अशी माहिती समितीच्या निवेदनात देण्यात आली आहे.

प्लॅटिनींनी १९९९ ते २००२ या कालावधीत केलेल्या कामाचा मोबदला त्यांना दिल्याचा दावा ब्लाटर यांनी केला होता. १९९८ सालापासून ब्लाटर हे फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत आणि त्यांना ५० हजार डॉलरचा, तर युरोपियन फुटबॉल महासंघाचे प्रमुख प्लॅटिनी यांना ८० हजार डॉलरचा दंडही सुनावण्यात आला होता.