फिफा अध्यक्षपदाच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार, हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होईल. मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांचे आत्मचरित्र येत्या आठवडय़ाभरात प्रकाशित होणार आहे. त्यांच्या माजी प्रवक्त्याने त्याचे लेखन केले आहे. ब्लाटर यांच्या आयुष्यभराचा प्रवास यात मांडण्याात आला आहे, असे वेर्ड अ‍ॅण्ड वेबर प्रकाशन संस्थेच्या एलेन डायझिग यांनी सांगितले.
ब्लाटर यांनी सप्टेंबरमध्ये फिफा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. फिफामध्ये त्यांचे अधिकृत प्रवक्ते म्हणून काम पाहणाऱ्या थॉमस रेंगली यांनी ‘मिशन फुटबॉल’ असे आत्मचरित्राला नाव देत ब्लाटर यांचे जीवन शब्दबद्ध केले आहे. ब्लाटर यांनी रेंगली यांच्याकडे अतिशय खासगी स्वरूपाची माहिती उलगडली, असे डायझिग यांनी सांगितले.
सध्या पुस्तकाचे काम अंतिम टप्प्यात असून, जर्मन भाषेतील आत्मचरित्र पुढील आठवडय़ात प्रकाशित होईल, तर त्याचा इंग्रजी अनुवाद जूनमध्ये प्रकाशित होईल, असे प्रकाशकांकडून सांगण्यात आले आहे. या पुस्तकात अनेक छायाचित्रांचा समावेश आहे. ब्लाटर यांची संपूर्ण कारकीर्द आणि फिफामधील सर्वोच्च पदाचा प्रवास हे सारे यात समाविष्ट करण्यात आले आहे. मे २०१५ पासून रेंगली यांनी पुस्तकाच्या लेखनाला प्रारंभ केला. येत्या काही दिवसांत फिफाचा पुढील अध्यक्ष निश्चित होईल.

फिफा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकला
झुरिच : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदाची २६ फेब्रुवारीला होणारी निवडणूक मतदान प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादामुळे पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती अध्यक्षपदाचे उमेदवार प्रिन्स अली यांनी केली आहे. याकरिता अली यांनी क्रीडा लवादाकडे तात्पुरत्या उपायाची मागणी केली आहे.