फुटबॉल महासत्ता असलेल्या ‘फिफा’ला काळीमा फासणारी घटना बुधवारी घडल्यानंतर त्याचे प्रतिसाद प्रखरपणे दिसू लागले आहेत. फिफा उपाध्यक्षांसह सात अधिकाऱ्यांना स्विस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतरही सेप ब्लाटर हे अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिटकून आहेत. त्यांच्या या k11कृत्यावर जगातील प्रसिद्धीमाध्यमांनी सडकून टिका करताना ‘ब्लाटर चले जाओ’ मोहीम उभी केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारपासून सुरू झालेल्या फिफा काँग्रेसमध्ये याची चर्चा रंगली होती.
लाथ मारेन तिथे..
स्वित्र्झलडमधील ‘ले मॅटीन डेली’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर ‘ब्लाटर यांनी पदभार सोडावा’ असा मथळा छापला आहे. तसेच ब्लाटर यांनी विश्वसनीयता गमावली असल्याचे इतर वृत्तपत्रांनी छापले आहे. ‘ले टेम्प्स’ यांनीही ‘मनमौजी कारभाराला चाप’ असा उल्लेख केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी नऊ फुटबॉल अधिकाऱ्यांसह १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहेत. लाच घेतल्याप्रकरणी ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर २० वर्षे कारावासाची कारवाई होऊ शकते, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ब्लाटर यांनी १७ वर्षे फिफाचे अध्यक्षपद भूषवले असून शुक्रवारी ते पुन्हा या पदावर पाचव्यांदा विराजमान होण्यासाठी तयार आहेत.
२०१०च्या स्पध्रेचे आयोजन मिळावे याकरिता दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांना एक कोटी अमेरिकन डॉलर लाच दिल्याचा ठपका अमेरिकन अधिकाऱ्यांनी ठेवला आहे, तर स्विस अधिकाऱ्यांनी २०१८ व २०२२व्या विश्वचषक आयोजनात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी फिफाच्या ज्युरिच येथील मुख्यालयात धाड टाकली होती. स्विस अधिकाऱ्यांच्या या धाडसत्रानंतर ‘दी टाइम्स ऑफ दक्षिण आफ्रिका’ वृत्तपत्राने ‘घोटाळेबाजांचा विश्वचषक’ असा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दाव्याला कमी महत्त्व दिले. ब्रिटनमध्ये ‘टाइम्स’ने ‘फिफाला लाल कार्ड’ असे म्हटले असून विशेष संपादकीयमध्ये त्यांनी ब्लाटर यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘ब्लाटर यांनी जगभरातील फुटबॉलची बदनामी केली आहे,’ असा उल्लेख त्यांनी विशेष संपादकीयमधून केला आहे. तसेच त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे आणि फिफामधील बदलांना मार्ग मोकळा करून द्यावा, असे स्पष्ट मत मांडले आहे.
‘दी गार्डियन’ वृत्तपत्राने ‘भ्रष्टाचाराची दरुगधी’ असा उल्लेख केला आहे, तर ‘सन’ सायंदैनिकाने जगातील सुंदर खेळात शिरलेला कर्करोग नष्ट करण्यासाठी ब्लाटर यांनी मार्ग मोकळा करावा, असा सल्ला दिला आहे. तसेच ‘सन’ने २०१८च्या विश्वचषकाचा मान ब्रिटनला मिळावा अशी मागणीही केली.
जर्मनीतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. ‘बिल्ड’ सायंदैनिकाने पहिल्याच पानावर ‘ब्लाटर, चालते व्हा!’ अशा मथळ्याखाली बातमी छापली आहे. ‘दी गॉडफादर’ दैनिकानेही ब्लाटर यांना पदभार सोडण्याची मागणी केली. या प्रकरणात ब्लाटर यांचा सहभाग नसला तरी वृत्तपत्रांनी त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला आहे. अशाच प्रकारच्या काही तिखट प्रतिक्रिया फ्रान्स, इटली, नेदरलॅण्ड, स्विडन, ऑस्ट्रेलिया, रशिया आदी देशांमधील वृत्तपत्रांनी व्यक्त करून ब्लाटर यांना पदभार सोडण्याचा सल्ला दिला.