फुटबॉल विश्वाला काळिमा लावणाऱ्या महाघोटाळ्याप्रकरणी चहूबाजूंनी दबाव वाढल्याने चारच दिवसांपूर्वी ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’ अर्थात फिफाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सेप ब्लाटर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी फिफा कार्यकारिणी समितीचे विशेष अधिवेशन लवकरच होईल, असे ब्लाटर यांनी स्वत:च सांगितले. 

विश्वचषक स्पर्धेचे आयोजन, विपणन आणि प्रसारण हक्कांसंदर्भात पैशाचा अपहार केल्याप्रकरणी अमेरिकेने सुरू केलेल्या चौकशीचा भाग म्हणून स्वित्र्झलड पोलिसांनी फिफाच्या चौदा पदाधिकाऱ्यांना अटक केली. अटकसत्रानंतर फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला. मात्र संघटनेवर हूकूमत गाजवणाऱ्या ब्लाटर यांची शुक्रवारी अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. संघटनेतील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करतानाच दोषींना शिक्षा व्हावी अशी भूमिका ब्लाटर यांनी चारच दिवसांपूर्वी घेतली होती.
भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या फिफा संघटनेत अमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे आणि अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर पदावर का राहावे या विचाराने मला ग्रासले. जगभरातील सर्व फुटबॉल संघटनांचा माझ्या नियुक्तीला पाठिंबा नव्हता. त्यामुळे अध्यक्षपदासंदर्भात मी फेरविचार केला आणि राजीनामा दिला.
सेप ब्लाटर

ब्राझीलच्या रिकाडरे तेक्सिएरा यांच्या चौकशीला सुरुवात
पीटीआय, रिओ डी जानिरो
आर्थिक गैरव्यवहारांबाबत ब्राझील फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष रिकाडरे तेक्सिएरा यांची अभियोक्त्यांद्वारे चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
अभियोक्ता समितीचे प्रवक्ते मार्सेलो डेल नेगरी यांनी सांगितले की, ‘‘रिकाडरे यांच्याकडे अध्यक्षपद असताना २००९ ते २०१२ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याबाबत सध्या कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.’’
रिकाडरे हे २३ वर्षे अध्यक्षपदी होते. २००९ ते २०१२ या कालावधीत त्यांच्या खात्यावर १४७ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल झाली आहे. ही रक्कम अतिशय मोठी असल्यामुळे त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याच काळात रिकाडरे हे विश्वचषक २०१४ स्पर्धेच्या संयोजन समितीवरही काम करीत होते. २०१२ मध्ये रिकाडरे यांनी आजारपणाचे कारण देत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्षपदी काम करताना विविध कराराबद्दल त्यांनी कोटय़वधी डॉलर्सची लाच स्वीकारली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत कोणत्या प्रकारे चौकशी करायची याचे सर्व अधिकार अभियोक्त्यांना देण्यात आले आहेत. रिकाडरे हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) माजी अध्यक्ष जाओ हॅव्हेलाँग यांचे जावई आहेत. हॅव्हेलाँग यांनी १९७४ ते १९९८ या कालावधीत फिफाचे अध्यक्षपद भूषविले होते.

जेरोमी निदरेष असल्याचा फिफाचा दावा
झुरिच : दक्षिण आफ्रिकेकडून जॅक वॉर्नर यांना दिलेल्या दहा दशलक्ष डॉलर्सच्या रकमेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) सरचिटणीस जेरोमी व्हाल्के हे निदरेष असल्याचे फिफाने म्हटले आहे.