सरत्या वर्षांत नोव्हाक जोकोव्हिचच्या अढळस्थानाला धक्का पोहोचला. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल तर दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ खेळूच शकले नाहीत. दुखापती आणि अचूकता हरवल्याने सेरेनाची जेतेपदांवरची पकड सैल झाली. याच काळात अँडी मरे आणि अँजेलिक कर्बर यांनी वर्षभरात आपल्या नावाची मोहोर उमटवली. नव्याकोऱ्या वर्षांतली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे. जोकोव्हिच, सेरेना दुखापतींची कात टाकून सज्ज आहेत. फेडरर, नदाल गतवैभवाची झलक दाखवण्यास आतुर आहेत. मरे, कर्बर नव्या वर्षांतही आम्हीच मानकरी असू, हे सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. या वलयांकित मंडळींच्या बरोबरीने ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी उत्सुक खेळाडूंची फौज प्रयत्नशील आहे. मेलबर्ननगरीत रंगणारी ही टेनिस मैफल आपल्याला दर्जेदार खेळाची अनुभूती देईल यात शंकाच नाही.

मरेसमोर जोकोव्हिचचे आव्हान

जेतेपदांवरच्या यंत्रवत हुकमतीसाठी गेली काही वर्षे नोव्हाक जोकोव्हिच प्रसिद्ध आहे. मात्र सरत्या वर्षांत जोकोव्हिचच्या खेळातले हे सातत्य हरवले आहे. दुखापती आणि गमावलेला सूर यामुळे जोकोव्हिचचा विजयरथ खंडित झाला. जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील या दुर्मीळ अशा अपयशी टप्प्यातच इंग्लंडच्या अँडी मरेने प्रगल्भ विजेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले. नैपुण्य असूनही मोक्याच्या क्षणी कच खाणारा खेळाडू अशी मरेची प्रतिमा होती. गेल्या वर्षभरात मरेने या प्रतिमेला छेद देत यशस्वी वाटचाल केली आहे. एखादा गुण गमावला तरी चिडचिड करणारा, रॅकेट तोडणारा या गोष्टी बाजूला सारत मरेने प्रतिभेला अथक मेहनतीची जोड देत विजयात घोटीव सातत्य आणले. विम्बल्डन जेतेपदासह मरेने शिरपेचात मानाचा तुरा खोवला. वर्षभरातील दमदार प्रदर्शनाच्या बळावर मरेने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी जोकोव्हिचची सद्दी भेदली. गेल्या वर्षी या स्पर्धेत झटपट गाशा गुंडाळलेल्या मरेने त्यानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदकासह वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या जेतेपदावरही कब्जा केला. इंग्लंडची आशा असलेला आणि आता सर अँडी मरे अशा बिरुदावलीसह अव्वल मानांकन मिळवलेला मरे वर्षांची सुरुवात जेतेपदाने करण्यासाठी आतुर आहे. जेतेपदातला मुख्य अडथळा जोकोव्हिचच आहे. गेल्या वर्षी झालेल्या चुका बाजूला सारत दिग्गज बोरिस बेकर यांच्याऐवजी मारिअन वादजा आणि सहयोगींच्या मार्गदर्शनाखाली नव्या डावपेचांसह कोर्टवर उतरणारा जोकोव्हिच जेतेपदासाठी आसुसलेला आहे.

जुने ते सोने

रॉजर फेडरर आणि ग्रँड स्लॅम जेतेपद यांच्यातील दरी दरवर्षी दुरावते आहे. गेल्या वर्षांत गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ल्याने फेडररला फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभागी होता आले नाही. शस्त्रक्रियेमुळे फेडरर उर्वरित हंगामात खेळूच शकला नाही. इतका प्रदीर्घ काळ फेडररविना टेनिस अनुभवण्याची वेळ दर्दी चाहत्यांवर पहिल्यांदाच ओढवली. नव्या वर्षांत फेडररने बहुप्रतीक्षित पुनरागमन केले. अद्भुत प्रतिभा लाभलेल्या टेनिसच्या आधुनिक शिलेदाराला १७वे मानांकन देण्यात आले आहे. फेडररच्या लौकिकाचा अपमान नको म्हणून हे मानांकन. १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररला शेवटचे ग्रँड स्लॅम पटकावून पाच वर्षे झाली आहेत. वय हा केवळ आकडा म्हणणाऱ्या फेडररच्या खेळात झालेला बदल जाणवू लागला आहे. खेळण्याच्या आनंदासाठी तो खेळतोय, परंतु त्याला प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत रिक्तहस्ते परतताना पाहणे, ही चाहत्यांसाठी ठसठसणारी सल आहे. दुसरीकडे ‘लाल मातीचा राजा’ राफेल नदाल दमदार ग्रँड स्लॅम पुनरागमनासाठी सज्ज आहे.

नवताऱ्यांची तयारी

शैली आणि घोटीव सातत्यापेक्षा परंपरागत खेळावर भर देणारा स्टॅनिसलॉस वॉवरिन्का जेतेपदासाठी शर्यतीत आहे. गेल्या तीन वर्षांत तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे त्याच्या चिकाटीचे आणि प्रतिभेचे प्रतीक आहे. वॉवरिन्का प्रत्येक सामन्यात वेगळा भासतो. प्रत्येक सामना एकजिनसी ऊर्जा, तंत्रकौशल्य आणि सातत्याने खेळल्यास वॉवरिन्का जेतेपदाची किमया घडवू शकतो. टेनिसचे भविष्य असे उंचपुऱ्या मिलास राओनिकला म्हटले जाते. खणखणीत सव्‍‌र्हिस करणारा राओनिक अनेकदा जेतेपदासमीप पोहोचला आहे. यंदा तर त्याला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. राओनिकच्या सुरेख खेळाला सातत्याची जोड मिळणे अत्यावश्यक आहे. केई निशिकोरी आणि मारिन चिलीच सातत्याने जेतेपदासाठी टक्कर देत आहेत.

सेरेनाला पर्याय मिळणार?

महिलांमध्ये सेरेना विल्यम्सनामक ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या सत्ताकेंद्राला अँजेलिक कर्बरच्या रूपात सक्षम पर्याय गेल्या वर्षभरात निर्माण झाला. महिला टेनिसमध्ये अभावानेच आढळणारे सातत्य अंगीकारत कर्बरने गेल्या वर्षी दोन ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई केली. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान ही सेरेनाची मक्तेदारी होती. कर्बरने इथेही ठसा उमटवत बाजी मारली. क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित कर्बरवर अपेक्षांचे ओझे आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना बाजूला सारत विक्रमी २३वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची हिंमत सेरेनामध्ये आहे. शरीराची साथ लाभली तर सेरेनाचा झंझावात युवा खेळाडूंना भारी पडू शकतो. निवृत्तीमुळे अ‍ॅना इव्हानोव्हिक, प्रतिबंधित उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने मारिया शारापोव्हा तर मातृत्वामुळे व्हिक्टोरिया अझारेन्का यंदा खेळताना दिसणार नाहीत. मात्र अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, सिमोन हालेप, कॅरोलिना प्लिसकोव्हा आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.

भारतासाठी जैसे थे

सालाबादप्रमाणे यंदाही आपली मदार लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा या अनुभवी त्रिकुटावर आहे. मार्टिना हिंगिसची साथ सोडल्यानंतर सानियाने बाबरेरा स्ट्रायकोव्हासह खेळतानाही जेतेपदांतले सातत्य राखले आहे. नव्या जोडीदारासह वर्षांची सुरुवात ग्रँड स्लॅम जेतेपदाने करत दुहेरीच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठण्याचा सानियाचा मानस आहे. चाळिशी ओलांडलेला पेस आणि तिशीतला बोपण्णा यांच्यावर आशा केंद्रित कराव्या लागतात, यातून अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अपयश स्पष्ट होते. टेनिस वैयक्तिक खेळ असला तरी खेळाडू घडवणे, प्रशिक्षकांची फौज तयार करणे, कोर्ट्सची उपलब्धता, व्यायाम आणि आहारतज्ज्ञ यापेक्षाही आयटा वैयक्तिक अहंकार आणि हितसंबंध जपण्यात दंग आहे. स्वत:भोवतीच्या कोशातून बाहेर आल्यास त्यांना भारतीय टेनिसचे साचलेपण जाणवेल.

पराग फाटक

parag.phatak@gmail.com