‘लिटल वंडर’ म्हणून जिचा उल्लेख करता येईल अशी सात वर्षांची दिव्या देशमुख हिने आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकून नागपूरसह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. दिव्या ही ७ वर्षांखालील वयोगटात राष्ट्रीय विजेती आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी संपलेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तिने आठवेळा विजय आणि एक पराभव अशा सामन्यांतून ८ गुण मिळवत ७ वर्षांखालील मुलींच्या गटाचे आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये तिने पाच फेऱ्यांच्या ब्लिट्झ प्रकारातही वर्चस्व राखत दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले.
दिव्या ही स्त्रीरोगतज्ज्ञ नम्रता व जितेंद्र देशमुख या दांपत्याची कन्या असून भवन्स शाळेची विद्यार्थिनी आहे. तिने ज्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले, त्यात वेगवेगळ्या गटांत ११ देशातील ४१५ खेळाडूंनी भाग घेतला होता. दिव्याला या स्पर्धेसाठी तिसरे मानांकन मिळाले होते. राहुल जोशी हे तिचे प्रशिक्षक होते. ‘मी भारतासाठी सुवर्णपदक मिळवले याचा मला खूप आनंद आहे’, अशी प्रतिक्रिया दिव्याने या यशाबद्दल व्यक्त केली. दिव्या बुद्धिबळाचा आदर्श विश्वाथन आनंदला मानते. याशिवाय इतर सवंगडय़ाप्रमाणे दिव्याला नाचणे आणि खेळणे आवडते. आशियाई स्पर्धेत कोणत्याही गटात असे देदिप्यमान यश मिळवणारी दिव्या ही पहिली वैदर्भीय खेळाडू आहे.