विश्वचषकातील सातत्यपूर्ण कामगिरीसह भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत दमदार आगेकूच केली आहे. मात्र विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची क्रमवारीत घसरण झाली आहे.
शमीने शानदार कामगिरीच्या जोरावर १४ स्थानांनी आगेकूच करीत ११ वे स्थान गाठले आहे. फिरकीच्या जादूसह संघाला विजय मिळवून देणाऱ्या रविचंद्रन अश्विनने सहा स्थानांनी सुधारणा करीत १६ वे स्थान मिळवले आहे.
फलंदाजांमध्ये कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो चौथ्या स्थानी आहे. दरम्यान, धोनीची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी साकारणारा शिखर धवन सातव्या स्थानी स्थिर आहे. रोहित शर्माची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो १६ व्या तर सुरेश रैनाने चार स्थानांनी सुधारणा करीत आगेकूच केली असून तो २० व्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध १६६ धावांची वेगवान खेळी करणारा ए बी डी’व्हिलियर्स फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. विश्वचषकात भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या कुमार संगकाराने दोन स्थानांनी सुधारणा करीत दुसरे स्थान पटकावले आहे.