माझी धावसंख्या ही मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम धावसंख्या असून, माझे योगदान पाहता एक नव्हे, तर किमान द्विशतक नोंदले गेले असावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर निवृत्त झाले, तरी मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष अद्यापि पॅड बांधून उभे आहेत. ते निवृत्त व्हायला तयारच नाही आणि त्यांची धावसंख्या शून्य आहे, अशा प्रकारचा टोला शुक्रवारी उद्धव यांनी ‘क्रिकेट फर्स्ट’च्या प्रचारसभेत हाणला होता.
शनिवारी बाळ म्हाडदळकर गटाच्या प्रचारसभेआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘‘वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेट सेंटर ही वास्तू, वांद्रे-कुर्ला संकुल येथील इनडोअर अकादमी, कांदिवलीचे सचिन तेंडुलकर जिमखाना या सर्व योगदानाकडे पाहिल्यास माझे नुसते शतक नव्हे, तर किमान द्विशतक झाले असावे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र होते. परंतु पुढच्या पिढीला मी गांभीर्याने घेत नाही.’’
डी. वाय. पाटील स्टेडियमला आयसीसीची मान्यता असल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘‘वानखेडे स्टेडियमचे नूतनीकरण चालू असताना डी. वाय. पाटील स्टेडियमला आयसीसीची मान्यता मिळाली होती. तिथे एक आंतरराष्ट्रीय सामनासुद्धा होणार होता, परंतु पावसामुळे झाला नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल वगैरे खेळांचे सामने खेळवता येत नाहीत, असे आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.’’
एमसीएच्या निवडणुकीत कोणीही महिला उमेदवार नाही, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही महिला उमेदवाराने एमसीए निवडणूक लढवण्याविषयी रस दाखवला नाही; परंतु महिला क्रिकेटच्या विकासाबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. निवडणूक झाल्यावर आम्ही एखाद्या महिलेला स्वीकृत सदस्य म्हणून सामावून घेऊ.’’
एमसीएची निवडणूक कोणी लढावी, हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. याबाबत पवार यांनी सांगितले, ‘‘जे किमान ३-४ वार्षिक सर्वसाधारण सभांना हजर राहिले आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशा प्रकारची सूचना करणारे पत्रक आमच्याकडे आले आहे. निवडणूक झाल्यावर घटनेतील या बदलाविषयी कार्यकारिणीत आणि गरज भासल्यास विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाईल.’’
मुंबईतील रणजी सामन्यांना क्रिकेटरसिकांची वानवा जाणवते, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी एमसीएने रणजी सामन्यांसाठी कोणतेही तिकीटदर आकारले नव्हते, परंतु तरीही प्रतिसाद अल्प होता. ही फक्त मुंबईचीच नव्हे, तर भारतातील सर्व रणजी सामन्यांच्या स्टेडियमची समस्या आहे. बीसीसीआय रणजी स्पध्रेच्या प्रचारात कमी पडते आहे.’’