आयुष्यातील सर्वात मोठी चूक केल्याची कबुली; १२ मार्चपासून तात्पुरती बंदी; रिओ ऑलिम्पिकला मुकण्याची शक्यता

‘‘उत्तेजकांचे सेवन करणे, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. या चुकीबद्दल होणाऱ्या शिक्षेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत यंदा बदल करण्यात आला होता. त्याबाबत मला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी अजाणतेपणाने जे औषध घेतले ते बंदी घातलेल्या यादीतील औषध असल्याचे मला नंतर कळले,’’ असे रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने स्पष्टीकरण दिले आहे.

‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत शारापोव्हा दोषी आढळली व २ मार्च रोजी तिने चुकीची कबुली दिली आहे. १२ मार्चपासून तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात येईल,’’ असे आयटीएफने कळवले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत शारापोव्हाला सेरेना विल्यम्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शारापोव्हाचे कायदेशीर सल्लागार जॉन हॅगर्टी याबाबत म्हणाले की, ‘‘शारापोव्हावर चार वर्षांकरिता बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. मात्र तिने नकळत हे उत्तेजक घेतले व चुकीची स्वत:हून कबुली दिली आहे. त्यामुळे तिच्यावर कमी कालावधीसाठी बंदी घातली जाईल.’’

‘‘रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची तिला संधी मिळेल अशी आम्हाला आशा आहे,’’ असे रशियन टेनिस महासंघाचे मुख्य शामील तापीश्चेव्ह यांनी सांगितले.

जागतिक महिला टेनिस संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह सिमोन यांनी म्हटले आहे की, ‘‘आमच्यासाठी हे आश्चर्यकारक वृत्त आहे. मारिया ही अतिशय आदर्श खेळाडू मानली जाते. तिच्याकडून हेतूपूर्वक उत्तेजक घेतले गेलेले नाही. यंदा त्या उत्तेजकावर बंदी घालण्यात आली आहे, याची माहिती तिला नव्हती. मात्र आपण कोणती औषधे घेतो व त्याचे काय परिणाम होतात, याची जबाबदारी सर्वस्वी त्या खेळाडूची आहे.’’

शारापोव्हाने घाईघाईने येथे पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ती निवृत्तीचीच घोषणा करणार असे पत्रकारांना वाटले होते. पत्रकार परिषदेत सुरुवातीला तिने सांगितले, ‘‘मी निवृत्ती स्वीकारल्याचा निर्णय जाहीर करणार असा तुमचा समज झाला असेल, मात्र सध्या त्याचा विचार नाही.’’

मेल्दोनियम या औषधाची कोणी शिफारस केली होती असे विचारले असता तिने त्याचे नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे.

व्यावसायिक साम्राज्याला हादरा

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे मारिया शारापोव्हाच्या व्यावसायिक साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे. नायके, पोर्सचे आणि टॅग यांनी तिच्यासोबतचे करार स्थगित केले आहेत. ‘‘उत्तेजक चाचणीत मारिया दोषी असल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक व क्लेशकारक आहे. जोपर्यंत तिची चौकशी सुरू राहील, तोपर्यंत तिच्याबरोबर केलेले करार स्थगित करण्यात आले आहेत,’’ असे नायके कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे टॅग हेयूर या घडाळय़ाच्या कंपनीनेही तिच्याबरोबरच्या कराराचे नूतनीकरण होणार नसल्याचे कळवले आहे.

ऊर्जा वाढवण्यासाठीच ‘मेल्दोनियम’चा वापर

हृदयरोगावरील औषध म्हणून मेल्दोनियम या औषधाचा उपयोग केला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचे सेवन करतात. रशियाची आइसस्केटिंगपटू एकतेरिना बोब्रोवा हिच्यासह यंदा अनेक खेळाडू याच उत्तेजकाच्या सेवनाखाली दोषी आढळले होते.