आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर शशांक मनोहर यांनी ‘यू-टर्न’ घेतला आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असून यापुढेही आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचा निर्णय शशांक मनोहर यांनी घेतल्याचे आयसीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शशांक मनोहर यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही दिवसांपासून मनोहर यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. आयसीसीचे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत तोवर आपण अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली. परिषदेच्या विनंतीला मान देऊन अखेर मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले आहे, अस आयसीसीने म्हटले आहे.

राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर शशांक मनोहर म्हणाले की, “आयसीसीच्या संचालकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा मी मान ठेवतो. पण राजीनामा देतानाचे मी वैयक्तिक कारण दिले होते त्यात काही बदल नाही. माझा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मी तूर्त अध्यक्षपदावर कायम राहणार आहे.”

 

शशांक मनोहर यांनी १५ मार्च रोजी वैयक्तिक कारण पुढे करत आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. पण त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामागे वेगळेच कारण सांगितले जात होते. बीसीसीआयचा विरोध डावलून आयसीसीच्या महसूल आराखड्यात बदल करण्यात आल्यामुळे मनोहर यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलल्याचे म्हटले गेले.

मनोहर यांची मे २०१६ साली आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती. दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा मनोहर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पण आपला वर्षभराचा कार्यकाल शिल्लक असताना असा तडकाफडकी राजीनामा दिल्याने मनोहर यांनी सर्वांना धक्काच दिला होता.