ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खुद्द शॉनने याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली. शॉन टेटला १९ मार्च रोजी भारतीय नागरिकत्व देण्यात आले. त्याने २०११ साली आंतरराष्ट्रीय वन डे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे प्रतिनिधीत्व करतो. शॉन टेटने याआधी अनेकदा भारताबद्दलचे प्रेम जाहीरपणे बोलून दाखवले आहे. २०१० साली आयपीएल स्पर्धेदरम्यान शॉन टेट याचे भारतीय वंशाची मॉडेल माशुम सिंघासोबत त्याचे सुत जुळले होते. चार वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २०१४ साली दोघांनी विवाह देखील केला.

३४ वर्षीय शॉन टेटने २००५ साली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००५ साली कसोटीतून त्याने क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले होते, तर २००७ साली वन डे क्रिकेटमध्ये शॉन टेटने एण्ट्री केली होती. शॉन टेटने तीन कसोटी आणि ३५ वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेट विश्वात सर्वाधिक वेगाचा चेंडू टाकणाऱयांच्या यादीत शॉन टेट दुसऱया क्रमांकावर आहे. त्याने तब्बल १६१.१ किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता. वन डे क्रिकेटमध्ये शॉन टेटच्या नावावर ६२ विकेट्स, तर ३ कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट्स जमा आहेत. शॉन टेटने आजवर तब्बल १७१ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून यात त्याच्या नावावर २१८ विकेट्सची नोंद आहे.