सचिनविषयक पुस्तकात मॅथ्यू हेडनने केली प्रशंसा
दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, अशी म्हण आहे, काही जणांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरते. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असे काहीसे उद्गार काढले आहेत ते ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने. सचिनकडे पाहिल्यावर त्याच्यामधल्या गुणवत्तेचा अंदाज येत नाही. त्याच्या लहान मूर्तीमध्ये एक वाघ दडलेला आहे, पण हे त्याच्या देहयष्टीकडे पाहून वाटत नाही, असे हेडनने म्हटले आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन ‘सव्वाशेर’ ठरलेला आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर तो एक सामान्य माणसासारखा वाटतो, पण त्याचे काळीज वाघाचे आहे,’’ अशी भावना हेडनला या वेळी व्यक्त करायची आहे.
‘‘सचिनचे नाव मी पहिल्यांदा नव्वदीच्या सुरुवातीला ऐकले होते. सचिनबद्दल एक गोष्ट कायम डोक्यात राहिलेली आहे आणि ती म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेशी देहयष्टी जुळताना दिसत नाही,’’ असे हेडनने ‘सचिन : क्रिकेटर ऑफ दी सेंच्युरी’ या विमल कुमार यांच्या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.
‘‘सचिनची देहयष्टी फारच सामान्य आहे, पण खेळाचा तो सच्चा राजदूत आहे. त्याच्याबरोबर खेळताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली आणि ती म्हणजे त्याच्या छोटय़ा चणीच्या देहयष्टीमध्ये एक वाघ दडलेला आहे,’’ असे हेडन म्हणाला.
हेडनने या वेळी सचिनबरोबरचा २००८ मधला एक प्रसंग या वेळी सांगितला. तो म्हणाला, ‘‘मोहालीच्या कसोटी दरम्यान मला सचिनबद्दलचा अविस्मरणीय अनुभव आला. या सामन्यात सचिनने सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. त्यावेळी मैदानाबाहेरचे वातावरण एवढे आनंदी आणि उत्साहवर्धक होते की, त्या वेळी लावलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे २० मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता.’’
याच पुस्तकामध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बकनन यांनी सचिन आणि रिकी पॉन्टिंग यांची तुलना केली आहे. ‘‘ या दोघांच्या आकडेवारीची तुलना केली तर सचिन हा पाँटिंगपेक्षा सरस क्रिकेटपटू आहे. जर सचिन हा जास्त पारंपरिक, अधिक शास्त्रीय पद्धतीचा आणि तांत्रिकृष्टय़ा सक्षम फलंदाज आहे. तर दुसरीकडे पॉन्टिंग हा नव्या पद्धतीचा फलंदाज आहे,’’ असे त्यांनी सांगितले.