भारताच्या एकदिवसीय संघातून वगळलेला तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला इराणी चषकासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले आहे. रणजी चषक विजेत्या मुंबईच्या संघाबरोबर शेष भारताचा सामना ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान वानखेडेवर होणार आहे. शेष भारतीय संघात सुरेश रैना, मनोज तिवारी, हरभजन सिंग, एस. श्रीशांत यांना स्थान देण्यात आले असले तरी युवराज सिंगला मात्र संधी देण्यात आलेली नाही. वरिष्ठ निवड समितीने बंगळुरू येथे शेष भारत संघाची घोषणा केली. या संघाबरोबर ऑस्ट्रेलिया संघाबरोबर सराव सामने खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्षीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय ‘अ’ संघात मुंबईच्या रणजी विजेतेपदात मोलाची भूमिका वठवणाऱ्या धवल कुलकर्णीला भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे. धवलबरोबर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही मुंबईकर या संघात आहेत.
 शेष भारतीय संघात हरभजन आणि श्रीशांत यांनाही संधी देण्यात आली आहे. फॉर्मात नसलेला सलामीवीर गौतम गंभीर याला या वेळी एकाही संघात स्थान दिलेले नाही.
 झहीर खान आणि उमेश यादव यांनी अजूनही त्यांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मंडळाला पाठवले नसल्याने त्यांचा विचार या संघनिवडीसाठी करण्यात आलेला नाही. दुखापतीतून सावरलेल्या मनोज तिवारीला शेष भारताबरोबरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे.
अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर अभिनव मुकुंदला देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अध्यक्षीय संघ दोन दिवसीय सराव सामना १२ आणि १३ फेब्रुवारीला चेन्नई येथे खेळणार आहे. भारतीय ‘अ’ संघ १६-१८ फेब्रुवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे तीनदिवसीय सराव सामना खेळणार आहे.
शेष भारत : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, मनोज तिवारी, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, हरभजन सिंग, एस. श्रीशांत, प्रग्यान ओझा, ईश्वर पांडे, अभिमन्यू मिथुन, अंबाती रायुडू, शामी अहमद आणि जलाज सक्सेना.
अध्यक्षीय इलेव्हन : अभिनव मुकुंद (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मनदीप सिंग, केदार जाधव, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, सरबजित लढ्ढा, परवेझ रसूल, मोहम्मद शामी, परविंदर अवाना आणि कमलेश मकवाना.
भारत ‘अ’ : शिखर धवन (कर्णधार), जीवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, सी. एम. गौतम, राकेश ध्रुव, जलाज सक्सेना, मनप्रीत गोणी, विनय कुमार, धवल कुलकर्णी आणि अशोक मनेरिया.